न्यायालयाने नोटीस बजावली अन् रखडलेल्या घटस्फोटाचा मार्ग झाला मोकळा

न्यायालयाने नोटीस बजावली अन् रखडलेल्या घटस्फोटाचा मार्ग झाला मोकळा

पुणे ः परस्पर संमतीने घटस्फोटाच्या दाव्यात वाद झाल्याने पत्नी वर्षभर सुनावणीला हजरच झाली नाही. त्यामुळे पतीने कंटाळून दावा काढून घेण्यासाठी अर्ज केला. मात्र सर्व परिस्थिती विचारत घेता न्यायालयाने नोटीस बजावल्यानंतर अखेर पत्नी हजर झाली. त्यानंतर समुपदेशक आणि वकिलांनी केलेल्या समुपदेशानानंतर पाच वर्षे वेगळे राहणाऱ्या दोघांचा घटस्फोटाचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला. संमतीने दाखल दाव्यात पक्षकारांना नोटीस बजावली जात नाही. मात्र हे प्रकरण त्याला अपवाद ठरले आहे. 

अशोक व सुरेखा (नावे बदलली आहेत) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही उच्चशिक्षित असून नोकरी करतात. अशोक पुण्यातील तर सुरेखा नाशिकची आहे. डिसेंबर 2014 मध्ये नाशिक येथे त्याचे अरेंज मॅरेज झाले. 11 महिने संसार केल्यानंतर विविध कारणांवरून त्यांच्यात वाद होऊ लागले. त्यामुळे नोव्हेंबर 2015 पासून दोघे वेगळे राहात होते. नोव्हेंबर 2019 पर्यंत त्यांच्यातील मतभेद तसेच राहिले. त्यानंतर कुटुंबातील वरिष्ठ मंडळींनी मध्यस्थी केल्यानंतर त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोटाचा निर्णय घेतला.

त्यानुसार ऍड. सूचित मुंदडा आणि ऍड. विशाल पडवळ यांच्यामार्फत येथील कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला. परंतु, त्यानंतरही काही कारणाने दोन्ही कुटुंबात पुन्हा वाद झाला. त्यामुळे ती तारखांना हजरच राहत नव्हती. शेवटी कंटाळून अशोक याने दावा काढून टाकण्यासाठी अर्ज केला. या दाव्यातील परिस्थिती लक्षात आल्यानंतर न्यायालयाने सुरेखा यांना हजर होण्याची नोटीस बजावण्यात आली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यानुसार ती काही दिवसांतच हजर झाली. त्यानंतर समुपदेशक आणि वकिलांनी समुपदेशन केल्यानंतर घटस्फोटाचा मार्ग मोकळा झाला. न्यायाधीश एच. के. गणात्रा यांनी घटस्फोट मंजूर केला.

एकतर्फी आदेशही करता येईना ः
एकाच पक्षकाराने दाखल केलेल्या दाव्यात प्रतिवादी न्यायालयात हजर होत नसेल तर त्यात एकतर्फी आदेश देण्याचे अधिकार न्यायालयाला आहेत. मात्र परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दावा दाखल केल्याने एकतर्फी आदेश करणे न्यायालयाला शक्‍य नव्हते. त्यामुळे न्यायालयाने सुरेखा यांना व्हॉट्‌सऍप, स्पीड पोस्ट किंवा मेलवरून नोटीस पाठवत हजर होण्याचे आदेश दिले. हजर झाल्यानंतर पत्नीला 13 लाख रुपये देण्याचे मान्य करून त्यांच्यात तडजोड झाली.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com