

दिवाळी म्हणजे आनंदाचं खळं
-सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.
माझं पहिले ते चौथीचे शिक्षण नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंजनगावी झालं. दिवाळीच्या काळात सहामाही परीक्षा संपली की दिवाळी सुट्यांची ओढ लागायची. चित्रकलेचा शेवटचा पेपर झाला की, महिनाभर दिवाळीची सुटी त्याकाळी जिल्हा परिषद शाळांना असायची. आमचे शेतकरी कुटुंब असल्याने व घरी दुधाचा व्यवसाय असल्याने शेतीची व गुरांच्या देखरेखीच्या कामात खारीचा वाटा उचलायचो. दिवाळीच्या काळात पिकाच्या काढणीचा, सोंगणीचा कालावधी असतो. तेव्हा शेतातील सगळी पिकं काढून त्याचं खळं करायचो. दिवाळी म्हणजे आम्हा भावंडासह मित्रांना आनंदाचं खळंच असायचं. कारण या काळात खूप खेळायचो, फटाकडे फोडायचो, वाचायचो आणि एकत्र फराळाचा आस्वाद घ्यायचो.
नवरात्रीचा सण आटोपल्यावर आमच्याकडे देवीची यात्रा व्हायची. त्यानंतर मग घरच्यांकडे फटाकड्यांसाठी आग्रह धरायचो. येवल्यात जाऊन फटाकडे आणणे, कपड्यांची खरेदी व्हायची. फटाकड्यांची आतषबाजी करताना त्याचे केलेले प्रयोग, वेगवेगळ्या पद्धतीने फटाक्यांवर डबे ठेवून ते आकाशात उडवायचा आनंद लुटला. घरात वडिलांमुळे सकाळ वर्तमानपत्र वाचायची सवय लागली. संपादकीय आवर्जून वाचयचो. कॉलेजला असताना ॲग्रोवन सुरू झाले, त्याचेही आम्ही नियमित वाचक. वाचनाची ही सवय दिवाळीत आणखी आनंद द्यायची, कारण या काळात दिवाळी अंक यायचे. सर्वच दिवाळी अंक आम्ही भावंडे वाचायचो. एकत्र कुटुंब पद्धती असल्याने वडील आणि तीनही चुलते वाचनाची आमची हौस भागवायचे. अजूनही दिवाळीत वाचनाचा शिरस्ता सुरू आहे. दिवाळीत वाचनाच्या आणि फराळाच्या खूप आठवणी आहेत. आईच्या हातचे गावरान तुपातील लाडू मला खूप आवडतात. घरी दुधाचा व्यवसाय असल्याने घरचेच तूप असायचे. आईच्या हातचे लाडू हे गावातही चर्चेचा विषय असायचा. आजच्या फास्टफुडच्या जमान्यात त्या चवीला एक वेगळं महत्त्व होतं.
एमपीएससी परीक्षेच्या तयारीच्या काळात राहुरी कृषी विद्यापीठात असताना चार-पाच वर्षे अभ्यास एके अभ्यास हेच ध्येय होते. शेतकरी कुटुंबातून संघर्ष करत शिकत असल्याने करिअरला महत्त्व दिले. आई-वडिलांच्या कष्टाचीही जाणीव होती. कृषी पदवीचे शिक्षण घेताना चारही वर्षे मी राज्यात पहिला आलो. राज्यपालांच्या हस्ते मला गोल्ड मेडलही मिळाले. एम. एसी. करत असतानाच एमपीएससीची क्लास वन अधिकारी पदासाठीची परीक्षा उत्तीर्ण झालो आणि आज कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांची सेवा करत आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा तयारीचा काळ वगळता दिवाळी सणाचा मनमुराद आनंद लुटला.
----
दिवाळी म्हणजे गेट टुगेदरची पर्वणी
दिवाळीच्या सुटी म्हणजे मित्र आणि नातेवाइकांना भेटण्याची पर्वणीच असते. विचारांची देवाणघेवाण होते. एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होता येते. कोणाच्या जीवनात एखादा दुःखद प्रसंगी घडला असेल, तर भेटून दिलासा देता येतो. लहानपणापासून गावी मित्र खूप असल्याने व आत्याचे मुले यायची त्यामुळे आम्ही भावंडे गावीच जास्त रमायचो. कारण क्रिकेट खेळायला खूप मिळायचे. त्यामुळे मामाच्या गावाला मी कमी जायचो. मित्रांच्या घरी जाऊन एकत्र फराळ खायचो. कॉलेज जीवनात राहुरी कृषी विद्यापीठात असताना दिवाळीच्या सुट्या कमी असायच्या. त्या वाढविण्यासाठी कॉमन आॅफचा खूप प्रयत्न करायचो. काही सिन्सिअर मुलांमुळे मोठ्या सुटीला व्यत्यय येत असल्याने त्यांच्यावर दबाव आणून त्यांना सुट्यांसाठी तयार करायचो. ती मजाच वेगळी होती.
-----
पायाभूत सुविधा उभारणीकडे लक्ष गरजेचे
यंदाचे वर्ष दुष्काळामुळे सर्वाची कसोटी पाहणारे आहे. पाण्याची सध्या बिकट अवस्था आहे. मर्यादित पाणी हेच आव्हान आहे. या काळात जे काही पाण्याचे स्रोत आहेत, त्याचा काटकसरीने वापर करावा. सूक्ष्म सिंचन पध्दतीचा वापर करावा. पिकांच्या कळीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये एकदा-दोनदा जरी पाणी देणे शक्य झाले, तरी चांगले उत्पादन मिळू शकते. फळबागांकडे विशेष लक्ष द्यावे, कारण त्यांचे नुकसान दूरगामी परिणाम करतात. त्यामुळे सीआरए तंत्रज्ञानाच्या व्हिडिओंची माहिती सोशल मीडियातून आवश्य घ्यावी. त्यातून कमी पाण्यात फळपिकांची चांगली काळजी घेऊ शकतो. दूरगामी नुकसान टाळू शकतो किंवा कमी करू शकतो. पायाभूत सुविधा उभारणीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे वाटते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.