Pune : भाऊबीजेला मंत्र्यांच्या निवासस्थानांवर ओवाळणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath Shinde

Pune : भाऊबीजेला मंत्र्यांच्या निवासस्थानांवर ओवाळणी

पुणे : राज्यातील आशा गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकांच्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या २६ ऑक्टोबर रोजी दुपारी भाऊबीजेच्या दिवशी मुख्यमंत्री यांच्या वर्षा आणि आरोग्यमंत्र्यांच्या पुण्यातील निवासस्थानांवर ओवाळणीचा कार्यक्रम करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने देण्यात आली.

राज्यातील गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकांना सरकारी सेवेत कायम करण्यात यावे, त्यांना एक महिन्याचा मोबदल्याएवढा दिवाळीपूर्वी बोनस द्यावा, मोबदला दुपटीने वाढण्यात यावा, किमान वेतन देण्यात यावे, प्रसूतीकाळात रजा मिळावी अशा विविध मागण्यांसाठी गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकांनी ११ ऑक्टोबर रोजी मंत्रालयावर मोर्चा काढला होता.

त्यावेळी गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकाच्या प्रतिनिधींची आरोग्यमंत्र्यांशी मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली होती. या बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकांच्या मागण्यांबाबत दिवाळीपूर्वी निर्णय जाहीर करू, असे आश्वासन दिले होते.

त्यानुसार संबंधित सर्व मागण्या मान्य करण्यात याव्यात, अशी राज्य सरकारकडे विनंती करण्यात आली आहे. परंतु या मागण्या मान्य न झाल्यास गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकांकडून २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कात्रज येथील निवासस्थानी ओवाळणी कार्यक्रम करण्यात येणार आहे. आरोग्य मंत्र्यांकडून मागण्यांच्या मान्यतेची भाऊबीज भेट मिळेल, असा विश्वास संघटनेचे एम. ए. पाटील, आनंदी अवघडे, सुमन पुजारी, भगवान देशमुख, श्रीमंत घोडके आदींनी व्यक्त केला आहे.