उदयनराजे भाजपमध्ये जाऊ नका; शेट्टींना उत्तर देत राजे म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू

पूरग्रस्त वाऱ्यावर

सातारा : राजकीयदृष्ट्या त्रासदासक असलेल्यांच्या मागे चौकशीचा फेरा लावून त्यांना भाजपमध्ये घेणे आणि पुन्हा त्यांची चौकशी थांबविणे, अशी भाजपची मेगाभरती सुरू आहे. महाराष्ट्रात जे सध्या सुरू आहे, त्याची आणि उदयनराजे भोसले यांची तुलना होऊ शकत नाही. विरोधी पक्ष सक्षम राहण्यासाठी उदयनराजेंनी भाजपमध्ये जाऊ नये, सध्यातरी त्यांनी याबाबतचा निर्णय घेतलेला नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितले. 

पुण्याला जाताना राजू शेट्टी आज साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांना भेटण्यासाठी आले. शासकीय विश्रामगृहात त्यांनी उदयराजेंची सदिच्छा भेट घेतली. त्यांची मनधरणी करण्यासोबतच लोकसभेत विरोधी पक्षांची ताकद दाखविण्यासोबतच जनसामान्यांसह शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आवाज उठविणारा खासदार हवा आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी उदयनराजेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. दोघांनी अर्धातास चर्चा केली. विरोधी पक्षाची ताकत केंद्रात राहावी, विरोधी पक्ष सक्षम राहण्यासाठी उदयनराजेंनी भाजपमध्ये जाऊ नये, अशी अपेक्षा शेट्टींनी उदयनराजेंकडे धरली. त्यावर उदयनराजेंनी अद्याप माझे काहीही ठरलेले नाही, असे सांगून चर्चेला पूर्णविराम दिला. 

यानंतर पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, ''पुण्याला जाताना वाटेत सातारा लागते, त्यामुळे महाराजांची भेट घेऊन चर्चा करावी, या उद्देशाने मी आलो आहे. सध्या शेतकऱ्यांचे प्रश्‍न केंद्रात ताकदीने मांडणारे विरोधी पक्षांचे खासदार असणे आवश्‍यक आहेत. मात्र, दुर्दैवाने विरोधी पक्षाचे खासदार कमी झाले असून पोकळी निर्माण झाली आहे. सध्या भारतीय जनता पक्षाचे तीन कार्यकर्ते आहेत. एक सीबीआय, दुसरी ईडी आणि तिसरा इन्कम टॅक्‍स विभाग. यांचा गैरवापर करून सध्या भाजपने मेगाभरती सुरू केली आहे. सीबीआयला इतर प्रश्‍न दिसत नाहीत. यापूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्तेचा तपास गतीने करता आला नाही. विविध आर्थिक गैरव्यवहार झाले त्याच्या चौकशीत ईडीला रस नाही.''

शेट्टी पुढे म्हणाले, ''चार वर्षापूर्वी ईडीच्या संचालकांना मी सहकारी साखर कारखान्यांचा साखर विक्री घोटाळा पुराव्यासह दिला होता. हवालाचा प्रकारही लक्षात आणून दिला होता. मोडीत निघालेले सहकारी साखर कारखाने खासगी झाल्यावर फायद्यात कसे आले, ते खरेदी करणाऱ्यांकडे पैसे कुठून आले याबाबत इन्कम टॅक्‍स विभागालाही लक्षात आणून दिले होते. पण याची चौकशी करण्यात त्यांनी रस दाखविला नाही.

डॉ. राजेंद्र गावित, बबनराव पाचपुते, दिलीप सोपल, मंत्री तानाजी सावंत, खुद्द सहकार मंत्री यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडविले. त्यांची साधी चौकशीही केली नाही. या आर्थिक गुन्हेगारांची चौकशी करावी, असे सीबीआय, ईडी वा इनकम टॅक्‍स विभागाला वाटले नाही. मात्र, राजकीयदृष्ट्या त्रासदासक असलेल्यांच्या मागे चौकशीचा फेरा लावून त्यांना भाजपमध्ये घेणे आणि पुन्हा त्यांची चौकशी थांबविणे अशी भाजपची मेगाभरती सुरू आहे.''

महाराष्ट्रात जे सध्या सुरू आहे, त्याची आणि उदयनराजे भोसले यांची तुलना होऊ शकत नाही. मुळात केंद्रात आणि राज्यात विरोधी पक्ष असणे हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. पण विरोधी पक्ष दुबळा राहिल्यास जनमाणसाचा आवाज दाबला जाणार आहे. सत्ता कोणाची ही असो जनसामान्यांचा आक्रोश राज्यकर्त्यांपर्यंत पोचविणे व त्यातून त्यांना निट वागायला लावणे ही विरोधी पक्षांची संविधानिक जबाबदारी आहे. सर्वजण एकाच पक्षात जायला लागल्यास एकपक्षीय राजवट निर्माण होण्याचा धोका असून सर्वसामान्याचा आवाज दाबला जाईल.'' असेही शेट्टी म्हणाले. 

कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू

कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार आहे. पूरपरिस्थितीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. घरांच्या नुकसानीत सानुग्रह अनुदान देताना पात्र लोकांची यादी मोठी पैसे कमी आहे. त्यामुळे जाणीव पूर्वक अपात्र लोकांची नावे या यादीत घुसवायची गावागावात तंटे निर्माण करायचे आणि वाटप थांबवायचे असा प्रकार सुरू आहे.

पूरग्रस्त वाऱ्यावर

केवळ बाहेरून आलेल्या मदतीवर पूरग्रस्त अवलंबून आहेत. शासनाकडून अद्याप पुरेशी मदत मिळालेली नाही. त्यांना काहीही करायचे नाही, पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडायचे, असेही शेट्टी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not Join BJP Raju Shetti requesting Udayanraje Bhosale