esakal | सावधान, "ओटीपी' शेअर करताय
sakal

बोलून बातमी शोधा

सावधान, "ओटीपी' शेअर करताय

राष्ट्रीयीकृत व सहकारी बॅंकेचे डेबिट व क्रेडिट कार्ड ग्राहकांना मिळते. कोणताही व्यवहार केल्यास डिजिटल पेमेंटचा ओटीपी मिळतो. हा ओटीपी सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिक अथवा कोणीही अनवधानाने ओटीपी शेअर करीत आहे.

सावधान, "ओटीपी' शेअर करताय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी (पुणे): ओटीपी शेअर करणं डोकेदुखी ठरते आहे. "अमुक-अमुक बॅंकेतून बोलत आहे...' असा फेक कॉल करून सायबर चोरटे ओटीपी शेअर करण्यास ग्राहकांना सांगत आहेत. अन्‌ क्षणार्धात डेबिट व क्रेडिट कार्डच्या खात्यातून पैसे गायब होत आहेत. गेल्या वर्षभरात सायबर सेलकडे अशा स्वरूपाच्या तब्बल 66 हून अधिक तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. तर ओटीपी शेअर करण्याच्या दुप्पट तक्रारी वर्षभरात दाखल झाल्या आहेत.


राष्ट्रीयीकृत व सहकारी बॅंकेचे डेबिट व क्रेडिट कार्ड ग्राहकांना मिळते. कोणताही व्यवहार केल्यास डिजिटल पेमेंटचा ओटीपी मिळतो. हा ओटीपी सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिक अथवा कोणीही अनवधानाने ओटीपी शेअर करीत आहे. ज्या क्षणी पैसे खात्यातून गेले, त्या क्षणी सायबर सेलकडे संपर्क केल्यास पैसे त्वरित मिळू शकतात. मात्र, वेळ गेल्यास सायबर गुन्हेगार सापडणे अवघड आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील कॅनरा बॅंक, कोटक महिंद्रा, एचडीएफसी, एसबीआय, सिटी कार्ड, कॅनरा, युको आदी बॅंका तसेच पेटीएम, ऍमेझॉन, मॅट्रीमोनी, ओलएक्‍स आदी ऍपच्या माध्यमातून ओटीपी शेअर करून पैसे खात्यातून गायब झाले आहेत. बऱ्याच वेळा ओटीपी शेअर न करताही ग्राहकांच्या खात्यातून पैसे गायब होत असल्याच्या तक्रारी सायबर सेलकडे आल्या आहेत. काही हॅकिंगचे प्रकार घडत आहेत. यासाठी डिजिटल पेमेंट करताना नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

वायफाय एटीएमही घातक
वायफाय एटीएमवर वायफाय दर्शवणारी खूण आहे. वायफाय एटीएमद्वारे क्षणार्धात पेमेंट होत आहे. ही वायरलेस टेक्‍नॉलॉजी आहे. ग्राहकांचा वेळ वाचतो. क्रेडिट व डेबिट कार्ड दोन्ही कार्डला ही सेवा लागू आहे. वायफाय एटीएमचा पासवर्ड नसतानाही दोन हजारांपर्यंत रक्कम सहजरीत्या खात्यातून गायब होऊ शकते. ग्राहकांचे एटीएम हरविले तर एटीएम ब्लॉक करेपर्यंत खात्यातील रक्कम गायब होण्याचीही भीती जास्त आहे. चार सेंटीमीटर अंतरापर्यंत जर एखादी व्यक्ती जवळ येऊन पाकिटाला काही अंतरावरून स्पर्श जरी झाला तरी रक्कम स्वाइप होते. बॅंकांकडे ग्राहक वायफाय एटीएम ब्लॉक करण्याची मागणी करीत आहेत.

सध्या असेही फसवणुकीचे प्रकार सुरू आहेत. मॉल, मल्टिप्लेक्‍स, पेट्रोल पंप, किराणा दुकान आदी ठिकाणी आता डिजिटल पेमेंट झाले आहे. त्यामुळे खिशात रोख रक्कम न बाळगता डिजिटल पेमेंट नागरिक करीत आहेत. मात्र, डिजिटल पेमेंटविषयी अज्ञान असल्यास कोणत्याही ऍपचा वापर करू नये. ओटीपी कोणालाही शेअर करू नये.

डिजिटल पेमेंटला हे तपासा
े- कार्ड स्वाइप केल्याची खात्री केली का?
- स्वतःचे एटीएम परत घेतले आहे का?
- ओटीपी स्वतः वापरला आहे का?
- तेवढीच रक्कम खात्यातून वजा झाली आहे का?

""ओटीपी कोणालाही शेअर करू नये. बॅंकेमधूनच फोन केला आहे का? याची शहानिशा करणे. स्वतः बॅंकेत जाणे. आता कोणतेही डिजिटल पेमेंट ओटीपीच्या माध्यमातूनच होणार आहे, त्यामुळे अजून सावधगिरी बाळगणे आवश्‍यक आहे. ज्या कंपनीची सेवा घेतली आहे, अशा कंपन्यांशी संपर्क पत्रव्यवहार करून गुन्हे शोधण्यास मदत घ्यावी लागते. बॅंकेकडून वायफाय सेवा बंद करून घ्या, अन्यथा कार्ड हरविल्यास तत्काळ ब्लॉक करा.''
- सुधाकर काटे, सायबर सेल, पोलिस निरीक्षक, पिंपरी

loading image
go to top