डॉक्टरला पेटीएम अँपची केवायसी अपूर्ण असल्याचे सांगत बोलण्यात गुंतवले आणि....

मिलिंद संगई
Sunday, 2 August 2020

बारामती शहरातील एका डॉक्टरांना अज्ञात भामट्यांनी फसवून 3 लाख 32 हजारांची रक्कम हातोहात लंपास केली. पेटीएम अँपची केवायसी अपूर्ण असल्याचे सांगत बोलण्यात गुंतवून ओटीपी क्रमांक घेत तीन बँकेतून ही रक्कम चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी राकेश मल्होत्रा या व्यक्तिविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बारामती - शहरातील एका डॉक्टरांना अज्ञात भामट्यांनी फसवून 3 लाख 32 हजारांची रक्कम हातोहात लंपास केली. पेटीएम अँपची केवायसी अपूर्ण असल्याचे सांगत बोलण्यात गुंतवून ओटीपी क्रमांक घेत तीन बँकेतून ही रक्कम चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी राकेश मल्होत्रा या व्यक्तिविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या संदर्भात शहरातील डॉ. महेंद्र रमणलाल दोशी यांनी फिर्याद दिली आहे. डॉ. दोशी यांच्या रण हॉस्पिटलची अँक्सिस व आयसीआयसीआय बँकेत खाती आहेत. त्यांच्या खात्याशी संलग्न मोबाईल क्रमांकावर राकेश मल्होत्रा या व्यक्तीने फोन केला. पेटीएम कंपनीतून कॉल असल्याचे सांगत 24 तासात केवायसी पूर्ण करण्यासाठी आपण सांगतो त्या नुसार कृती करा, असे त्याने डॉक्टरांना सांगितले. 

त्यानुसार गुगल प्ले स्टोअरवरून क्विक सपोर्ट ॲप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. या ॲपमध्ये आलेला आयडी क्रमांक त्याने विचारून घेतला. केवायसी अपलोड करण्यासाठी दोशी यांना सात रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यांनी ही रक्कम भरल्यानंतर ॲक्सिस बॅंकेतून तुम्हाला काॅल येईल त्यांना ओटीपी द्या, असे सांगितले. त्यानंतर काही वेळातच 912260047700 या क्रमांकावरून दोशी यांना कॉल आला. ओटीपीची मागणी करण्यात आली.

त्यांनी तो दिल्यानंतर लागलीच त्यांच्या व पत्नीच्या खात्यातून पाच ट्रान्झेक्शनद्वारे 3 लाख 32 हजार रुपये गायब झाले. अवघ्या काही मिनिटात रक्कम कपात झाल्याचे मेसेज मोबाईलवर आल्यानंतर डॉ.. दोशी यांनी तात्काळ बॅंकेत धाव घेतली, त्या नंतर त्यांची अज्ञाताने फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु झाला आहे. 

कोणालाही कसलाही ओटीपी क्रमांक मोबाईलवरुन शेअर करु नका किंवा अनोळखी व्यक्तीस आपल्या बँकेचे व इतर तपशिल देऊ नका असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor Cheating by Criminal Crime