डॉक्‍टरांने आरोपीला कोरोनाचा संशयीत असल्याचे घोषित केले अन्....

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

संचारबंदीच्या काळात आरोपीला पकडण्यासाठी स्वतः डॉक्‍टर पोलिसांसह त्याचा घरी गेले.मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे डॉक्‍टरांनी शक्कल लढविली.

येरवडा - बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉस्को) अंतर्गत संशयीत आरोपीला पकडण्यासाठी फिर्यादी असलेल्या डॉक्‍टरांने आरोपीला कोरोनाचा संशयीत असल्याचे घोषित केल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले. स्थानिक रहिवाशांनी संबंधित कुटुंबालाच बहिष्कृत करण्याचा प्रयत्न केला. मात्र सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे स्थानिक नागरिकांचा गैरसमज दूर झाला असला तरी संबंधित कुटुंबाकडे संशयानेच पाहिले जात आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण झाल्याची तक्रार डॉक्‍टरांनी येरवडा पोलिस ठाण्यात केली. मुलीचे वडील डॉक्‍टर असल्यामुळे तातडीने यंत्रणा कामाला लागली.संचारबंदीच्या काळात आरोपीला पकडण्यासाठी स्वतः डॉक्‍टर पोलिसांसह त्याचा घरी गेले.मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे डॉक्‍टरांनी शक्कल लढविली. त्यांनी चक्क आरोपी कोरोनाचा संशयीत रुग्ण असून त्याला उपचारासाठी नायडू रुग्णालयात घेऊन जात असल्याचे सांगितले.त्यामुळे स्थानिक रहिवाशांचा संबंधित कुटुंबावर दबाव आणला. पोलिसांनी आरोपीला पकडून पोलिस ठाण्यात नेले. 

त्यानंतर मात्र स्थानिक रहिवाशांनी संबंधित कुटुंबालाच बहिष्कृत केले.त्यांच्याकडे संशयाने पाहू लागले.परिसरात भितीची वातावरण पसरले.ही बाब सामाजिक कार्यकर्ते डॅनियल लांडगे यांना समजली.त्यांनी कुटुंबाची व पोलिसांची भेट घेतल्यानंतर खरा प्रकार समोर आला. त्यांनी स्थानिक रहिवाशांचा गैरसमज दूर केला. तरी सुध्दा संबंधित कुटुंबाकडे रहिवाशी संशयाने पाहिले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctors suspect corona patient to arrest the accused