Pune : 'एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर बोलण्याचा नैतिक अधिकार भाजपला आहे का?' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर बोलण्याचा नैतिक अधिकार भाजपला आहे का?'

'एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर बोलण्याचा नैतिक अधिकार भाजपला आहे का?'

पुणे : भाजपने सत्तेत असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी एसटीत लांब पल्ल्याच्या एसी बस भाड्याने घेतल्या. आता केवळ एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे भांडवल करून विलीनीकरणाचा मुद्दा कर्मचाऱ्यांच्या तोंडी घालून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे नौटंकी करत आहेत. असा आरोप करून माजी अर्थमंत्री सुंदर मुनगंटीवार यांनी एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाचा विरोध का केला ?, भाजप संप चिघळवून एसटी कर्मचाऱ्यांचा जीव घेत आहे का ? त्यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? या प्रश्नांची उत्तरे भाजपने द्यावीत अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी केली आहे.

खासगीकरणाची आवड असलेल्या मोदी सरकारने गेल्या सात वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील तीन लाख कोटींचे उद्योग विकले. एअर इंडिया कंपनी विकली. रेल्वेचे खासगीकरण केले. असे एक एक करून मोदी सरकार सरकारी संस्था विकण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे, तेथे एसटीचे खासगीकरण झाले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या ९९ टक्के मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याची इच्छा आहे. मात्र भाजप त्यांच्यावर दडपशाही करीत आहे. त्यांना एसटी कर्मचाऱ्यांचे तसेच सामान्य जनतेचे काही देणे घेणे नाही. कर्मचाऱ्यांच्या नावाखाली सामान्य प्रवाशांना वेठीस धरले जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फायदा घेऊन राजकीय पोळी भाजप आहे. भाजपची खेळी राज्य सरकारने ओळखली आहे. त्यामुळे आता भाजपने ही नौटंकी बंद कारवी. असे वरपे म्हणाले.

loading image
go to top