रिक्षाचे सीट फाडल्याने श्‍वानाला व पिलाला हॉकीस्टीकने अमानुषपणे मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

तुमच्या वाहनाचे सीट कव्हर एखाद्या मांजराने किंवा श्‍वानाने फाडले तर तुम्ही काय कराल, फार फार तर त्यांना हुसकावून लावाल किंवा तुमचे वाहन दुसरीकडे पार्कींग कराल.

रिक्षाचे सीट फाडल्याने श्‍वानाला व पिलाला हॉकीस्टीकने अमानुषपणे मारहाण

पुणे - तुमच्या वाहनाचे सीट कव्हर एखाद्या मांजराने किंवा श्‍वानाने फाडले तर तुम्ही काय कराल, फार फार तर त्यांना हुसकावून लावाल किंवा तुमचे वाहन दुसरीकडे पार्कींग कराल. परंतु, सहकारनगर येथे पावसामुळे आपल्या पिलाला घेऊन रिक्षाचा आधार शोधणाऱ्या एका श्‍वानास व त्याच्या पिलास रिक्षाचालकाने अक्षरशः हॉकीस्टीकने अमानुषपणे मारहाण केली. त्यामध्ये श्‍वानाचे तोंड फुटून त्यास गंभीर दुखापत झाली, तर श्‍वानाच्या पिलाचा एक पाय ही मोडला. प्राण्यांशी क्रुरपणे वागणाऱ्या संबंधित रिक्षाचालकाविरुद्ध एका स्वयंसेवी संस्थेने सहकारनगर पोलिसात गुन्हा दाखल केला, तर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यास तत्काळ बेड्या ठोकून कायद्याचा हिसका दाखविला. हि घटना गुरुवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास सहकारनगर परिसरात घडली.

नागनाथ पांडुरंग भोसले (वय 52, रा.तळजाई माता वसाहत, सहकारनगर) असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला या "मिशन पॉसिबल' या स्वयंसेवी संस्थेमध्ये काम करतात. सहकारनगर परिसरातील तळजाई माता पायथ्याशी असलेल्या गोळवलकर गुरुजी रस्त्यावरील नवग्रह शनी मंदिराजवळच्या रस्त्यावर मोरे हा त्याची रिक्षा लावत होता.

दरम्यान, गुरुवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास मोरे याने त्याच्या रिक्षात बसून सीट फाडल्यामुळे तांबड्या पांढऱ्या वर्णाच्या श्‍वानाला व त्याच्या तांबड्या वर्णाच्या पिलाला हॉकीस्टीकने जबर मारहाण केली. या मारहाणीमध्ये श्‍वानाचे तोंड फुटून त्यास गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. श्‍वानाच्या पिलालाही हॉकीस्टीकने मारहाण केल्यामुळे त्याच्या पाठीमागचा पाय मोडला. दरम्यान, फिर्यादी महिला या सायंकाळी नवग्रह शनी मंदिरासमोरुन जात होत्या. त्यावेळी संबंधित रिक्षाचालक हा श्‍वानाला मारहाण करीत असल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी त्यांच्या संस्थेच्या अधिकाऱ्यांना बोलावून याबाबत तत्काळ सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

दरम्यान, या घटनेनंतर रिक्षाचालक पसार झाला होता. दरम्यान, संबंधित गुन्ह्यातील संशयित आरोपी हा तळजाई माता वसाहतीजळील शनि मंदिराजवळ उभा असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकास मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी भोसले यास अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यानेच गुन्हा केल्याची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी त्यास सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हि कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदिप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, पोलिस कर्मचारी अमोल पवार, अजय थोरात, इम्रान शेख यांच्या पथकाने केली.

Web Title: Dog And Puppy Brutally Beaten By Hockey Stick For Tearing Rickshaw Seat Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..