

भूलथापांना बळी पडू नका
‘जीडीपी’च्या आरोपांवर पीयूष गोयल यांची टीका
नवी दिल्ली, ता. २ : “काही बेरोजगार लोक स्वतःला अर्थतज्ज्ञ म्हणवून घेतात आणि देशाचे नुकसान करण्यासाठी वृत्तवाहिन्यांवरील चर्चांमध्ये सहभागी होतात. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका,” अशी टीका केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी केली.
‘जीडीपी’च्या आकड्यावरून वादाला सुरुवात झाली असून, जुन्या आणि नव्या आकडेवारीच्या मालिकेची तुलना करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप गोयल यांनी केला. दिल्ली येथे ‘ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’च्या वार्षिक अधिवेशनात बोलताना ते म्हणाले, “दूरचित्रवाहिन्यांवर काही विरोधी पक्षांचे नेते; तसेच माजी अर्थसचिव किंवा माजी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरही या आकडेवारीवर प्रश्न उपस्थित करताना दिसतात. ‘सफरचंदाची तुलना सफरचंदाशीच करावी’ एवढेही त्यांना कळत नाही. आधार वर्षच बदललेल्या नव्या मालिकेतील आकडेवारीची जुन्या मालिकेशी तुलना करून ते देशातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत.”
रोजगाराच्या प्रश्नावरही गोयल यांनी विरोधकांना लक्ष्य केले. ते म्हणाले, “ते आकडेवारीत त्रुटी शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘नोकऱ्या कुठे आहेत?’ असे विचारत आहेत. मात्र, ते स्वतःच उरलेले एकमेव बेरोजगार लोक आहेत, हे त्यांना पचत नाही. त्यांच्यासाठी उरलेले एकमेव काम म्हणजे दूरचित्रवाहिनीवरील चर्चेत सहभागी होऊन एखादा युक्तिवाद तयार करणे आणि तो खोटा ठरवण्याचा प्रयत्न करणे.”
….
सत्य लपवता येत नाही. मंत्री ही आकडेवारी तयार करीत नाहीत. जेव्हा तुमची मानसिकता इतकी नकारात्मक असते, तेव्हा तुम्ही स्वतःचेच नुकसान करीत असता. सत्याचा विपर्यास करून लोकांचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे जनतेशी प्रतारणा करण्यासारखे आहे.
- पीयूष गोयल, केंद्रीय वाणिज्यमंत्री
‘दूरदृष्टी असणारे नेतृत्व’
पीयूष गोयल यांनी ७.८ टक्के जीडीपी वाढीचा उल्लेख करत तिचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला दिले. ते म्हणाले, “७.८ टक्के ही विक्रमी वाढ अभूतपूर्व आहे. इतर कोणत्याही देशाला अशी वाढ साध्य करता आलेली नाही. देशातील १४० कोटी जनतेची क्षमता, मेहनत आणि सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. त्यामुळे भारत जागतिक स्तरावरील विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयास आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी दूरदृष्टीने देशाचे नेतृत्व केले आहे.”
‘काँग्रेस नशेत आहे काय?’
केरळ काँग्रेसने समाज माध्यमांवर बीअरच्या मगचा फोटो शेअर करत जीडीपी आकडेवारीची तुलना बीअरच्या फेसाशी केली. त्यावर पलटवार करत केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ‘काँग्रेस जास्त बीअर प्यायल्यामुळे नशेत आहे की त्या पक्षाला भारताच्या प्रगतीचा इतका तिरस्कार आहे की त्यांचा जमिनी वास्तवाशी संपर्कच तुटला आहे," असा प्रश्न रिजीजू यांनी उपस्थित केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.