अल्पचरित्रसंपूर्ण नाव : डॉ. बाबासाहेब पांडुरंग आढावप्रचलित नाव : डॉ. बाबा आढावजन्मतारीख : १ जून १९३०जन्मस्थळ : पुणे शिक्षण : बी.एस्सी., डीएएसएफ जन्म : १ जून १९३० मृत्यू : ८ डिसेंबर २०२५.सत्यशोधकी विचारांचे नेते आणि कष्टकरी कामगार चळवळींचा आधारवड, अशी ओळख असलेल्या डॉ. बाबा आढाव यांनी आयुष्यभर फेरीवाले, कचरावेचक, हमाल या असंघटित कामगारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी संघर्ष केला. स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन आणि आणीबाणीविरुद्धची चळवळ, या तिन्ही महत्त्वाच्या चळवळीचे ते साक्षीदार आणि सक्रिय कार्यकर्तेही होत.बाबा यांचा जन्म १ जून १९३० रोजी पुण्यात झाला. श्री शिवाजी मराठा हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी रसायनशास्त्रात पदवी आणि आयुर्वेदिक वैद्यकशास्त्रात पदविका शिक्षण पूर्ण केले..बाबांवर लहानपणापासून राष्ट्र सेवा दलाचे संस्कार झाल्यामुळे महात्मा फुले आणि साने गुरुजी यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. श्री शिवाजी मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक जगताप यांचे समाजवादी चळवळीतील संस्कार झाल्यामुळे ते सत्यशोधक चळवळीकडे आकर्षित झाले.बाबांनी वैद्यकीय सेवा सुरू केल्यानंतर त्यांच्या घराच्या आसपास असणाऱ्या व्यापारी पेठांमुळे येणाऱ्या रुग्णांमध्ये हमालांची संख्या खूप मोठी होती. त्यांच्याशी बोलताना हमालांवरील शोषणाची आणि अन्यायाची जाणीव झाल्यामुळे १९५५ मध्ये त्यांनी हमाल पंचायत स्थापन केली. हा त्यांच्या सामाजिक संघर्षातील सर्वांत महत्त्वाचा टप्पा ठरला..गुलटेकडी येथे त्यांनी उभी केलेली ‘हमाल पंचायती’ची भव्य वास्तू त्याची साक्ष आहे. हे ‘हमाल भवन’ समाज परिवर्तनाचे केंद्र म्हणून महाराष्ट्राला परिचित आहे. हमाल पंचायतीमार्फत बाबांनी केलेल्या सततच्या संघर्षामुळे १९६९ ला राज्यात महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायदा मंजूर झाला.असंघटित कामगारांच्या कल्याण आणि सुरक्षेसाठी हा देशातील पहिला कायदा होता. हमाल पंचायतीमार्फत त्यांनी कष्टाची भाकर, हमाल नगर, हमाल भवन, हमाल पतसंस्था, कष्टकरी विद्यालय असे मोठे रचनात्मक काम उभे केले..पुढे वैद्यकीय व्यवसाय सोडून बाबांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक चळवळींसाठी वाहून घ्यायचे ठरवले. महात्मा फुले यांच्या विचारांचे अनुयायी असल्याने त्यांनी वर्ग, जाती आणि स्त्री-पुरुष विषमतेविरोधात अनेक आंदोलने केली. १९६२ मध्ये त्यांनी राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणाविरोधात आंदोलन केले. राज्यघटनेने कायद्याच्या दृष्टीने अस्पृश्यता नामशेष केली असली तरी प्रत्यक्षात तिचे अस्तित्व संपले नव्हते.‘गाव एक पण पाणवठे अनेक’, अशी प्रत्येक गावाची अवस्था होती. याविरोधात १९७२ मध्ये त्यांनी ‘एक गाव-एक पाणवठा’ अशा शीर्षकाचे मोर्चे राज्यभरात काढले. या चळवळीच्या निमित्ताने त्यांनी सगळा महाराष्ट्र पिंजून काढला. यासाठी महात्मा फुले समता प्रतिष्ठानची स्थापना केली..बाबा यांनी सामाजिक चळवळींसह काही काळ राजकारणातदेखील काम केले. ते पुणे महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले होते. खेड मतदारसंघातून त्यांनी लोकसभेची निवडणूकही लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. कालांतराने राजकारण सोडून समाजकारणावरच संपूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.पुण्यातील कामगारांना स्वस्त, ताजा व सकस आहार ‘ना नफा-ना तोटा’ या तत्त्वावर उपलब्ध करून देण्यासाठी ‘कष्टाची भाकर’ ही योजना त्यांनी सुरू केली. पुण्यात गेल्या पाच दशकांपासून ही योजना अव्याहतपणे सुरू आहे. शहरात या योजनेच्या अनेक शाखा सुरू झाल्या..चळवळ, आंदोलन, सत्याग्रह, उपोषण अशा लोकशाही मार्गाने त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर संघर्ष केला. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा लढा, जोगतीणींच्या पुनर्वसनाचे काम, देवदासींची प्रथा संपविण्यासाठी प्रयत्न, असंघटित कामगारांचे प्रश्न, अशा अनेक समस्यांसाठी बाबांनी वेळोवेळी सक्रिय आंदोलनात सहभाग घेतला.राष्ट्रीय पेंशन अदालत, मोलकरीण पंचायत, रिक्षा पंचायत, कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत, विषमता निर्मूलन समिती, अशा विविध संघटनांची त्यांनी स्थापना केली. अगदी अलीकडच्या काळात त्यांनी ‘ईव्हीएम’विरोधात चार दिवसीय आत्मक्लेष आंदोलन केले. रिक्षाचालकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलनेही केली..सहा आसनी रिक्षांच्या विरोधात रिक्षा पंचायतीने बाबा यांच्या नेतृत्वाखाली डिसेंबर १९९७ मध्ये संप पुकारला होता. त्यावेळी पोलिसांच्या लाठ्यांचा मार त्यांना सहन करावा लागला. पुढे ते आंदोलन राज्यव्यापी झाले. विविध आंदोलनांसाठी त्यांना अनेक वेळा तुरुंगवास झाला.सामाजिक चळवळी, आंदोलनांसाठी बाबांनी सदैव आपली लेखणी आणि वाणी झिजवली. राज्यासह देशभरातील गावागावांमध्ये त्यांनी आपल्या भाषणांमधून सामाजिक प्रश्नांची मांडणी केली. महात्मा फुले यांच्या ‘सत्य सर्वांचे आदि घर। सर्व धर्मांचे माहेर’, या अखंडाचा उल्लेख त्यांच्या प्रत्येक भाषणात असे. लेखणीच्या माध्यमातून त्यांनी कामगारांच्या, उपेक्षितांच्या प्रश्नाला वाचा फोडली..पुरोगामी सत्यशोधक पत्रिकेत गेली पाच दशके त्यांनी सातत्याने लेखन केले, तसेच पुरोगामी आणि सत्यशोधकी कार्यकर्त्यांनीही व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यांची ‘एक गाव-एक पाणवठा’, ‘सुंबरान’, ‘सत्यशोधनाची वाटचाल’ अशी काही पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. यासह विविध वर्तमानपत्रे, नियतकालिकांमधूनही त्यांनी नियमित लेखन केले. सातारा येथे भरलेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते..संस्थात्मक कामाचा आढावा१९४३ ते १९५० मध्ये राष्ट्र सेवा दलाचे संघटक१९५६ मध्ये ‘हमाल पंचायत, पुणे’ची स्थापना१९५० मध्ये ‘झोपडी संघा’ची स्थापना१९६३ मध्ये महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी पुनर्वसन परिषदेच्या स्थापनेत सहभाग१९७१ मध्ये महात्मा फुले समता प्रतिष्ठानची स्थापना१९७२ मध्ये ‘एक गाव-एक पाणवठा’ चळवळ१९७४ मध्ये ‘पुरोगामी सत्यशोधक’ त्रैमासिकाची सुरुवात१९७४ मध्ये देवदासी प्रथा निर्मूलन व पुनर्वसन चळवळ१९८२ मध्ये राष्ट्रीय एकात्मता परिषदेची स्थापनासंसदबाह्य क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अर्थसाह्य करण्यासाठी ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ची स्थापनापुण्यातील ५० हजार रिक्षाचालकांना संघटित करून रिक्षा पंचायतीची स्थापना.मिळालेले पुरस्कारमहाराष्ट्र फाउंडेशन, अमेरिका यांच्यातर्फे जीवनगौरव पुरस्कारयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे जीवनगौरव पुरस्कार‘द वीक’ इंग्रजी साप्ताहिकातर्फे २००७ मध्ये ‘मॅन ऑफ द इयर’ राष्ट्रीय पुरस्कार‘टाइम्स ऑफ इंडिया’तर्फे २०११ मध्ये उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्त्याचा राष्ट्रीय पुरस्कार, तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते गौरवपुण्यभूषण फाउंडेशनचा ‘पुण्यभूषण पुरस्कार’रिलायन्स इंडस्ट्रीजतर्फे धीरूभाई अंबानी पुरस्कारमहात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, यशवंतराव चव्हाण, कवी कुसुमाग्रज आदींच्या नावे असलेले विविध संस्थांचे पुरस्कार.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.