तंत्रज्ञानामुळे वनसंवर्धनात क्रांती - डॉ. गाडगीळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

'नव्या तंत्रज्ञानामुळे तरुणांच्या हातात स्मार्ट फोन आले. त्यातून अक्षांश- रेखांश अचूक कळू लागले आणि त्याचा वापर जंगल संवर्धनासाठी होऊ लागला. नव्या तंत्रज्ञानामुळे एक प्रकारची क्रांती व्हायला लागली आहे,'' असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी केले.

पुणे - 'नव्या तंत्रज्ञानामुळे तरुणांच्या हातात स्मार्ट फोन आले. त्यातून अक्षांश- रेखांश अचूक कळू लागले आणि त्याचा वापर जंगल संवर्धनासाठी होऊ लागला. नव्या तंत्रज्ञानामुळे एक प्रकारची क्रांती व्हायला लागली आहे,'' असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी केले.

डॉ. गाडगीळलिखित "निसर्गाने दिला आनंदकंद' या पुस्तकाचे प्रकाशन अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी "सकाळ'चे संचालक संपादक श्रीराम पवार उपस्थित होते. "सकाळ' प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

डॉ. गाडगीळ म्हणाले, 'गडचिरोलीमधील गावांनी सामूहिकपणे वनसंपत्ती जपली. वनअधिकारामुळे ती तेथील नागरिकांच्या हातात आहे. वनसंवर्धनाची जोपासना करण्याला शास्त्रीय जोड देण्यासाठी पाच अभ्यासक्रम राज्य सरकारने सुरू केले. या अभ्यासक्रमात सहभागी होणाऱ्या मुला-मुलींची निवड ग्रामसभेतून होते. त्यातून वेगळ्याच पातळीवर काम करणारे लोक तयार होत आहेत. कारण, त्यांना तेथील वनांचे, वनस्पतींचे प्रचंड आकलन आहे. रोज जगताना ते हेच पाहात असतात. त्याला शास्त्रीय ज्ञानाची जोड दिल्याने ते खूप व्यवस्थित काम करायला लागले आहेत.''

'स्मार्ट फोनच्या रूपात खूप शक्तिमान संगणक त्यांच्या हातात आले आहेत. अक्षांश-रेखांश दाखवणे हे स्मार्ट फोनमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे जंगलांच्या सीमा निश्‍चित होतात. त्या सीमा "अपलोड' करू शकतात. तो नकाशा मिळतो. त्यातून माहिती मिळते. हे सगळे करायला ही मुले भराभर शिकत आहेत,'' असेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. केळकर म्हणाले, 'या पुस्तकातून डॉ. गाडगीळ यांनी फक्त माहिती नाही, तर विचार मांडले आहेत, त्यामुळे हे पुस्तक शाळेच्या पाठ्यपुस्तकात असावे, इतके ते महत्त्वाचे आहे.''

पवार म्हणाले, 'या पुस्तकाला शास्त्रीयच नाही, तर साहित्याचाही साज आहे. डॉ. गाडगीळ यांचा अनुभव, संशोधन, चिंतन या सगळ्याचा सार पुस्तकरूपात आला आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Madhav Gadgil Talking Nisargane Dila Anandkand Book Publish