पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयाची १२० वर्षांची वाटचाल

Naidu-Hospital
Naidu-Hospital

कोरोनाच्या साथीमुळे पुन्हा चर्चेत आलेले नायडू रुग्णालय मुळात साथरोगांसाठीच बांधण्यात आले होते. ब्रिटिशकाळात प्लेगच्या साथीतील रुग्णांसाठी बांधण्यात आलेल्या या रुग्णालयाला तब्बल एकशेवीस वर्षांचा इतिहास आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुंबईत प्रथम आलेली प्लेगची साथ अल्पावधीत म्हणजे १९ डिसेंबर १८९६ ला पुण्यात दाखल झाली आणि तिने हाहाकार उडविला. या साथीत चार वर्षांमध्ये म्हणजे १९०० पर्यंत १७,२३१ पुणेकरांचा मृत्यू झाला. त्यामुळे साथ सुरू झाली, की पुणेकरांना गावाबाहेर न्यायचा उपाय करण्यात आला. त्याचबरोबर रुग्णांना दाखल करण्यासाठीच्या रुग्णालयांची कमतरता जाणवू लागली. त्यामुळे त्या वेळी अस्तित्वात असलेल्या पुणे नगरपालिका, पुणे सबर्बन म्हणजे पुणे उपनगरपालिका आणि पुणे कॅंटोन्मेंट या तीन स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्लेगकरिता संगमाजवळ स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्याचे ठरविले. त्यानुसार १९०० मध्ये प्लेगसाठी रुग्णालय सुरू केले, तेच आत्ताचे नायडू रुग्णालय.

रुग्णालयाच्या स्थापनेवेळी त्याला नायडू हे नाव देण्यात आले नव्हते. पुण्यात १९४० पर्यंत प्लेगची साथ अधूनमधून येत होती. त्यातील १९३४ च्या साथीमध्ये १२५४ जणांना प्लेग झाला आणि त्यातील १०७९ जण मरण पावले. एकेदिवशी मृतांचा आकडा ८० पर्यंत गेला. संगमावरील प्लेगच्या रुग्णालयात मृतदेह ठेवण्यास जागा अपुरी पडत होती. कोणत्या पेठेत किती मृत्यू झाले, याची माहिती प्रथम ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होत होती.

आपल्या घरातून रुग्णालयात नेलेल्या आपल्या नातलगाचा मृत्यू झाला आहे का, ते पाहण्यासाठी विश्रामबागवाड्याच्या फलकावर नावे लावण्यात येऊ लागली. ते पाहायला नागरिकांच्या झुंडीच्या झुंडी येत असत. त्याच काळात प्लेग आटोक्‍यात आणण्यासाठी नेमलेल्या प्लेगप्रतिबंधक समितीचे अध्यक्ष होते डॉ. नायडू. याच नायडूंनी केलेल्या कामाची पावती म्हणून या रुग्णालयाला त्यांचे नाव देण्यात आले आणि ते झाले नायडू रुग्णालय.

या रुग्णालयात पुढील काळात क्षयाचे रुग्णही ठेवण्यास सुरुवात झाली आणि महापालिकेच्या स्थापनेनंतरच्या स्वातंत्र्योत्तर काळातही हे रुग्णालय पुणेकरांना सेवा देऊ लागले ते आत्तापर्यंत. कोरोनाच्या साथीतही हे रुग्णालय कोरोनाबाधितांना बरे करण्यासाठी झटते आहे.

आमच्यापर्यंत पोहोचवा कोरोना वॉरिअर्स
पुण्याच्या विविध भागांतील गरजूंच्या मदतीला लोकप्रतिनिधी रात्री-अपरात्री धावून गेले. त्यामुळेच अनेकांना उभारी मिळाली. आपल्या लोकप्रतिनिधींनी अशाच प्रकारे मदत केली असल्यास ‘सकाळ’ला आवर्जून कळवा.  
व्हॉट्‌सअप करा - 91300 88459
Email - editor@esakal.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com