
पुणे - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या गुन्ह्यातील आरोपींच्या तपासादरम्यान सीबीआयने मला पंच म्हणून बोलावले होते. आरोपी हत्येच्या ठिकाणी आलेल्या गेल्या मार्गांचा पोलिस तपास करीत असताना त्या गाडीत आरोपी सचिन अंदुरे देखील होता. त्याने शिवाजीनगर बस स्थानकापासून ओंकारेश्वर पूल, भिडे पूल असा सर्व मार्ग आणि ठिकाणे दाखविली, अशी साक्ष पंच असलेले बँक अधिकारी विशाल माईणकर यांनी शनिवारी (ता.१७) न्यायालयात दिली.
विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या खटल्याची सुनावणी सुरू आहे. यावेळी सीबीआयने पंच म्हणून उपस्थित केलेल्या माईणकर यांची साक्ष नोंदविण्यात आली. माईणकर म्हणाले, पंचनाम्याच्या दिवशी मी रेल्वेच्या पोलिस ठाण्याबाहेर थांबलो होतो. तिथे सीबीआयचे अधिकारी भेटले. त्यावेळी गाडीमध्ये सचिन प्रकाशराव अंदुरे होता. सर्व सीबीआयचे अधिकारी व कर्मचारी होते. सचिन अंदुरे दाखवेल त्याप्रमाणे गाडी पुढे जात होती. पंचनामा झाल्यावर आम्ही सीबीआयच्या कार्यालयात गेलो. पंचनामा टाइप झाला. त्यावर आरोपींची सही, दोन पंचांच्या सह्या व कर्मचाऱ्यांची सही घेतली. दरम्यान आरोपींचे वकील प्रकाश साळसिंगीकर यांनी पंचांची उलटतपासणी घेतली. तुम्हाला काही माहिती नाही, तुमच्यासमोर काही झालेले नाही, तुमच्या केवळ सह्या घेतल्या, असा आरोप त्यांनी पंचांवर केला. खटल्याची पुढील सुनावणी एक ऑक्टोबरला होणार आहे.
शिवाजीनगर बस स्टँड ते कमिन्स कॉलेज -
अंदुरेने पहिल्यांदा शिवाजीनगर बस स्थानक दाखवले. त्यानंतर जंगली महाराज रस्ता मार्गे ओंकारेश्वर पूल, अमोल जनरल स्टोअर्स, अमेय अपार्टमेंट, कॉसमॉस बँकेवरून भिडे पूलमार्गे राजा मंत्री चौक दाखविला. तेथून आम्ही कर्वेनगरमध्ये गेलो. कमिन्स कॉलेज येथे पंचनामा थांबला. तोवर सीबीआयच्या कर्मचाऱ्यांनी सर्व नोंदी घेतल्या होत्या, असे माईणकर यांनी न्यायालयास सांगितले.