सय्यदभाईंनी परिवर्तनाची चळवळ चालविली - डॉ. नीलम गोऱ्हे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

पुरुषी व्यवस्था बदलली पाहिजे
सय्यदभाई म्हणाले, ‘‘तलाक देताना पतीला कुणापुढेही जाऊन काहीच सांगायची गरज नाही. धर्माने पुरुषाला खूप अधिकार दिले आहेत. सगळी शिक्षा, त्रास महिलांनाच का, पुरुषांना का नाही? पुरुषी समाजाने रचलेली ही धर्म व्यवस्था बदलली पाहिजे, त्यासाठी झटलो. माझ्या बहिणीला तलाक दिला होता, तो कायदा बदलण्यासाठी झटत राहिलो. घराबाहेर नको; घरात महिलेला मानवी आणि समानतेची वागणूक दिली पाहिजे.’

पुणे - ‘मुस्लिम महिलांचे दुःख, प्रश्न, वेदना ज्वालामुखीसारखे धगधगते आहे. ते सोडविण्यासाठी सय्यदभाईंनी परिवर्तनाची, संघर्षाची चळवळ चालविली, हे इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले जाईल,’’ असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्री आधार केंद्र आणि परिवर्तन या संस्थांच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सय्यद मेहबूबशाह कादरी ऊर्फ सय्यदभाई यांना पद्मश्री मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार उल्हास पवार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी, सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा पाठक, परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष डॉ. शैलेश गुजर या वेळी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘महिलांवर अत्याचार झाल्यावर सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या जातात; पण त्यातील एकतरी व्यक्ती महिलेला मदत करते का? समाज माध्यमातील क्रियाशीलता प्रत्यक्ष मदतीत होत नाही, त्याशिवाय महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबणार नाहीत. सय्यदभाईंनी केलेल्या कामाचे, त्यांच्या पद्धतीचे लिखित रूप तयार झाल्यास पुढील पिढ्यांसाठी साह्यभूत ठरेल.’’

पवार म्हणाले, ‘‘तलाक पीडित महिलांसाठी त्यांनी परिवर्तनाची चळवळ चालविली. त्यांच्या समाजातील लोकांची मने घडविली, मते बदलली. त्यांचा सन्मान उशिरा झाला; पण झाल्याचे समाधान आहे.’’

जोशी म्हणाले, ‘‘सचोटी, हातोटी आणि कसोटी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सय्यदभाई आहेत. त्यांचे काम आजच्या काळाला आणि तरुणांना प्रेरणा देत राहील.’’

गुजर म्हणाले, ‘‘मुस्लिम समाजातील पीडित महिलांना त्यांनी न्याय मिळवून दिला. या समाजात मुले दत्तक घेता येत नाहीत, त्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आणि मूल दत्तक घेतले.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr neelam gorhe talking about sayyadbhai