
पुणे : आयुष्यभर ज्ञानाची साधना अंगीकारत शिक्षणातून ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भावना रुजविणारे, परदेशी आणि भारतीय विद्यार्थ्यांमधील ऋणानुबंध अधिक खोल रुजविण्यासाठी अहोरात्र झटणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि ‘सिंबायोसिस’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांचा ९०व्या वाढदिवसानिमित्त ‘सकाळ’च्या वतीने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नव्वदी पार केलेल्या वयातही अगदी अधिकारवाणीने ‘युद्धाशिवाय जग हवे असेल, तर भारतीय संस्कृतीतील ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पनाच जगात रुजवायला हवी,’ अशी भूमिका मांडणाऱ्या व ज्ञानी ते ज्ञानयोगी होण्याचा प्रवास केलेल्या डॉ. मुजुमदार यांच्या सन्मान सोहळ्याच्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा योग पुणेकरांनी बुधवारी ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवला. निमित्त होते, ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने डॉ. मुजुमदार यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे.