डॉ. प्रभाकरन यांची रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचे फेलो म्हणून निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dr vinod c prabhakaran

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल) शास्त्रज्ञ डॉ. विनोद सी. प्रभाकरन यांना लंडनच्या द रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचे फेलो म्हणून निवड झाली आहे.

Pune News : डॉ. प्रभाकरन यांची रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचे फेलो म्हणून निवड

पुणे - राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल) शास्त्रज्ञ डॉ. विनोद सी. प्रभाकरन यांना लंडनच्या द रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचे फेलो म्हणून निवड झाली आहे. वैज्ञानिक जगतातील एक प्रतिष्ठित संस्थेचे फेलो म्हणून निवड होणे ही एक सन्मानाची बाब आहे.

डॉ. विनोद यांचे पदव्युत्तर शिक्षण केरळ राज्यातील कोट्टायमच्या महात्मा गांधी विद्यापीठातून झाले. त्यांनी बंगळुरच्या जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च येथून प्रा. सी. एन. आर. राव यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनशास्त्रात पी.एच.डी. प्राप्त केली. नेदरलॅंडच्या टेक्निकल युनिव्हर्सिटी आइंडहोव्हन, डेन्मार्क टेक्निकल युनिव्हर्सिटी आणि अमेरिकेच्या कार्डिफ युनिव्हर्सिटीत संशोधन कार्य केले. २०१० मध्ये एनसीएलच्या उत्प्रेरक विभागात ज्येष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम करण्यास सुरुवात केली व त्यांचा स्वतंत्र संशोधन गट सुरू केला.

संशोधन -

डॉ. प्रभाकरन यांचा गट पृष्ठभाग विज्ञान संबंधीचा अभ्यास आणि संरचित उत्प्रेरक विकसित करण्याचे काम करत आहे. ज्यांचा उपयोग विविध उत्प्रेरक प्रक्रियांमध्ये आण्विक-स्तरीय सूक्ष्म माहिती जाणून घेण्यासाठी होतो. गेल्या काही वर्षांपासून कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि मिथेनच्या आंशिक ऑक्सिडेशनसाठी उत्प्रेरक विकसित करण्यासाठी ते प्रयत्नशील आहे. १२५ पेक्षाही जास्त शोधनिबंध आणि एक अमेरिकन पेटंट त्यांच्या नाववर आहे. आतापर्यंत त्यांनी नऊ पी.एच.डी. च्या प्रबंधांचे पर्यवेक्षक म्हणून काम केलेले आहे आणि सात विद्यार्थ्यांना पी.एच.डी.साठी ते मार्गदर्शन करत आहेत.

टॅग्स :pune