
पुण्यात अतिरिक्त आयुक्तांच्या देखरेखीखाली होणार नाले सफाई
पुणे - पावसाळ्यात नाल्यांमधील प्रवाह अडकू नये, पाणी तुंबून परिसरातील वस्तीला धोका निर्माण होऊ नये, यासाठी नाले सफाईचे काम सुरू केलेले असताना ही कामे योग्य पद्धतीने होत आहेत की नाही हे पाहण्यासाठी थेट अतिरिक्त आयुक्तांना जागेवर जाऊन पाहणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. ही कामे कामे १५ जून पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत.
शहरातील नाले आणि पावसाळी गटारे साफ करण्यासाठी महापालिकेने तब्बल १२ कोटी रुपयांच्या ३० निविदा मंजूर केल्या आहेत. यातील बहुतांशी निविदा या ३५ टक्के ते ४२ टक्के कमी दराने आल्याने कामाचा दर्जाबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत.
२०१९ मध्ये आंबिल ओढ्यासह इतर ओढ्यांना आलेल्या पुरानंतर नाले सफाईचा प्रश्न ऐरणीवर आला होता. केवळ दिखाऊ कारवाई केली जात असल्याने पावसाळ्यात पाणी तुंबून शेजारच्या वस्तीमध्ये घरांमध्ये पाणी घुसत असल्याचे प्रकार समोर आले. तसेच शहरात संततधार पाऊस सुरू झाल्यानंतर दरवर्षी नाल्यांशेजारील वस्तीला सतर्क राहण्याचा इशारा दिला जातो.
महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत कमी दराने निविदा आल्याने काम चांगले होणे आवश्यक आहे. गेल्या महिन्याभरापासून शहराच्या विविध भागात नाले सफाईचे काम सुरू आहे. त्यामध्ये नाल्यातील राडारोडा काढणे, वाढलेले गवत, खुरटी झाडे, कचरा काढून प्रवाह रिकामा केला जात आहे. या कामांवर मलःनिसारण विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष असले तरी अतिरिक्त आयुक्तांना थेट जागा पाहणी करून येण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, विलास कानडे यांना हे आदेश दिले आहेत. ही कामे १५ जून पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, असे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
जुन्या हद्दीसह समाविष्ट गावातील नाल्यांची लांबी - ६४७ किमी
पावसाळी गटारी - १५० किमी
चेंबर्सची संख्या - ३१०००
Web Title: Drainage Cleaning Will Be Done In Pune Under The Supervision Of Additional Commissioner
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..