बी. टी. कवडे रस्त्यावर वाहतेय सांडपाणी; नागरिक, दुकानदार त्रस्त 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

बी. टी. कवडे रस्त्यावर वाहणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

घोरपडी (पुणे) : बी. टी. कवडे रस्त्यावर वाहणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सोमवारी (ता. 21) पाऊस पडल्यापासून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर सांडपाणी वाहत आहे. सिताडेल सोसायटीपासून वटारे मळ्यापर्यंत अर्धा किलोमीटर रस्त्यावरून नागरिकांच्या दुकान व घरासमोरून सांडपाणी वाहत आहे. या सांडपाण्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बी. टी. कवडे रस्ता परिसरातील मुख्य रस्ता असल्याने नागरिकांना सांडपाण्याच्या पाण्यातूनच ये-जा करावी लागत आहे. यामुळे परिसरातील दुकानदार वैतागले असून, या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे ग्राहक ही दुकानाकडे सध्या फिरकत नाही.

प्रशासनाने चेंबर दुरूस्त करुन पाण्याचा निचरा करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक बाळासाहेब मोडक यांच्यासह दुकानदारांकडून वारंवार करण्यात येते. परंतु, दरवर्षी प्रशासन तात्पुरते उपाय करत असून, पाऊस पडल्यावर पुन्हा त्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे.  सोमवारी पडलेल्या पावसात तारादत्त कॉलनी, कृष्णा ई नगर, ज्ञानेश्वर पार्क या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. गेल्या वर्षी या परिसरातील घरात पाणी साचल्याने मोठे नुकसान झाले होते. यंदा मात्र, पाण्याचा प्रवाह कमी असल्याने फारसे नुकसान झाले नाही. परंतु, जोरदार पाऊस पडल्यावर संपूर्ण कॉलनीत आणि घरात पाणी जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मागील तीन वर्षांपासून ही समस्या निर्माण होत असून, याकडे स्थानिक नगरसेवक आणि महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. यामुळे दिवसेंदिवस ही समस्या गंभीर बनत आहे. परिसरातील नैसर्गिक ओढ्यावर भराव टाकून अनाधिकृत घरे बांधली आहेत. तसेच परिसरात एका मोठ्या बिल्डरने बांधकाम करताना ओढ्याचा मार्ग बदला आहे. सोबतच पावसाचे पाणी ड्रेनेजच्या लाईनमध्ये सोडले जात आहे. यामुळे रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे. महापालिकेचे मुख्य कार्यालय आणि क्षेत्रीय कार्यालय यांच्याशी संपर्क साधला असता अधिकाऱ्यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलत उत्तरे देण्याचे टाळले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: drainage water flow on b t kavade road