प्लॅस्टिक बाटल्यांपासून साकारलं स्वप्नातलं घर

सागर आव्हाड 
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

आपण आपली तहान भागल्यानंतर सहजपणे पाण्याची बाटली कचऱ्यात फेकून देतो. मात्र तुम्हाला जर कुणी कचऱ्यातील बाटल्यांपासून आपलं घराचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं, असं सांगितलं तर?... होय, हे खरं आहे. पुण्यातील राजेंद्र इनामदार या अवलियाने चक्क अशा बाटल्यांपासून घर बनवलंय.

पुणे - आपण आपली तहान भागल्यानंतर सहजपणे पाण्याची बाटली कचऱ्यात फेकून देतो. मात्र तुम्हाला जर कुणी कचऱ्यातील बाटल्यांपासून आपलं घराचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं, असं सांगितलं तर?... होय, हे खरं आहे. पुण्यातील राजेंद्र इनामदार या अवलियाने चक्क अशा बाटल्यांपासून घर बनवलंय.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आपलं स्वतःचं सगळ्यांपेक्षा हटके घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोण काय शक्कल लढवेल, त्याचा नेम नाही. सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या सिंहगड घेरा गावात इनामदार यांनी बाटल्यांपासून घर साकारलंय. या घराचं विशेष म्हणजे घराच्या भिंती विटांऐवजी चक्क कचऱ्यात फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्यांपासून उभारल्या आहेत, त्यासाठी सत्तर हजार बाटल्यांचा वापर करण्यात आला आहे. 

‘प्लॅस्टिक रिसायकल’ ही संकल्पना डोक्‍यात ठेवून सिंहगडावरून तसेच इतरत्र कचराकुंडीत टाकून दिलेल्या बाटल्या त्यांनी गोळा केल्या. भिंतीच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या एका विटेची किंमत ७ ते ८ रुपये येते. याउलट जर बाटल्यांचा वापर केला तर हीच किंमत साडेतीन ते चार रुपयांपर्यंत पडते. 

बाटली तयार करण्यासाठी वापरले जाणारे प्लॅस्टिक जर जमिनीत पुरले, तर त्याला ‘डी-कंपोज’ होण्यासाठी साडेचारशे ते हजार वर्षे इतका कालावधी लागतो. अशा प्रकारे घरासाठी बाटल्यांचा वापर केल्याने पर्यावरणाची हानी टाळण्यास मदतदेखील होते, असे इनामदार यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A dream home made of plastic bottles