बोपदेव घाटातील कचऱ्याच्या दुर्गंधीने वाहनचालक त्रस्त

पुणे - बोपदेव घाटात रस्त्याच्या कडेला पडलेला अस्ताव्यस्त कचरा.
पुणे - बोपदेव घाटात रस्त्याच्या कडेला पडलेला अस्ताव्यस्त कचरा.

पुणे - शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य खबरदारीसह स्वच्छतेच्या केलेल्या आवाहनाला बोपदेव घाट परिसरात मात्र हरताळ फासला जात आहे. घाटात सर्व प्रकारचा कचरा टाकला जात असून, त्याच्या दुर्गंधीने येथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे- सासवड दळणवळणासाठी हा जवळचा मार्ग असल्याने पुणे व पुरंदर तालुक्‍यातील नागरिकांची या घाटातून वर्दळ वाढली आहे. रात्रीच्या वेळी उशिरा टेम्पो, ट्रकमधून आणलेला कचरा घाटात रिचवला जातो. यात बांधकामाचा राडारोडा, हॉस्पिटलमधील औषधांच्या बाटल्या, सिरींज, दारू-बिअरच्या बाटल्या, भाजीपाल्याचा कुजलेला कचरा, फाटलेले व जुने जीर्ण झालेले कपडे, शिळे अन्न, झाडांच्या फांद्या, घरांतील कचरा, रसवंतीगृहांतील उसाचा कचरा, दगड-माती आदींचा समावेश आहे. पुणे बाजूकडून सासवडच्या दिशेने जाताना घाटाच्या सुरवातीलाच जागोजागी कचऱ्याचे छोटे-मोठे ढीग दृष्टीस पडतात. येथून प्रवास करताना नागरिकांना मात्र दुर्गंधीमुळे नाक मुठीत धरूनच जावे लागते. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन व योग्य ती कारवाई करून उपाययोजना करावी, अशी मागणी कोंढवा, येवलेवाडी, पुरंदर तालुक्‍यातील ग्रामस्थ व वाहनचालकांनी केली आहे. 

बोपदेव घाटातील कचऱ्याचा प्रश्‍न लवकरच सोडविला जाईल. यापूर्वी दोन वेळा शिवसेनेच्या वतीने तेथील कचरा उचलला होता. मात्र, रात्रीच्या वेळी लोक तेथे कचरा टाकतात. त्यावर योग्य उपाययोजनेसाठी महापालिकेत हा प्रश्‍न मांडणार आहे. 
- संगीता ठोसर, नगरसेविका, शिवसेना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com