

पान १४ साठी
संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर
रब्बी हंगामाचे नियोजन
------------------
यंदा रब्बी पेरणीची घाई न करता शेतातील परिस्थितीचा आढावा घेऊन लागवड नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी जमिनीतील ओलावा, पाण्याचा साठा, जमिनीचा प्रकार, पीक पद्धती, पीक कालावधी तसेच उत्पादन खर्च व बाजारपेठ या बाबींचा विचार करणे गरजेचे आहे.
------------------
डॉ. ज्ञानेश्वर राऊत, सुरज जाधव, डॉ. सुदर्शन शेंडे
--------------------
यंदाच्या राज्यातील अनेक भागांमध्ये अपुरा पाऊस, पावसाचे असमान वितरण यामुळे रब्बी हंगामात पाणीटंचाईचे गंभीर आव्हान निर्माण झाले आहे. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान, विहिरी व बोअरवेलमधील घटणारी पाणीपातळी, धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न यांचा परिणाम रब्बी हंगामावर होण्याची शक्यता आहे. परिणामी यंदाचा रब्बी हंगाम आव्हानात्मक ठरणार आहे. अशा परिस्थितीत केवळ पाऊस पडण्याची वाट पाहणे किंवा पारंपरिक पद्धतीने संपूर्ण क्षेत्रावर पेरणी करणे योग्य ठरणार नाही. सद्यःस्थितीचा अंदाज घेऊन पाण्याचे बजेट तयार करणे, जमिनीतील ओलावा तपासणे, कमी पाण्यात येणारी पिके निवडणे, पीक विविधीकरण करणे, आच्छादनाचा वापर करणे आणि पिकाच्या महत्त्वाच्या अवस्थेत संरक्षित सिंचन या उपायांना प्राधान्य द्यावे. अपेक्षित उत्पादन मिळविण्याबरोबरच उत्पादन खर्च आणि आर्थिक जोखीम कमी करण्यावर भर द्यावा. उपलब्ध पाण्याचा योग्य वापर, चारा व्यवस्थापन, पीक विमा आणि कृषी तज्ज्ञांचा वेळेवर सल्ला यामुळे दुष्काळाचा परिणाम कमी करण्यास मदत होऊ शकते. यंदाच्या रब्बी हंगामात दुष्काळाचे आव्हान समजून घेऊन त्यानुसार नियोजन करणे आवश्यक आहे.
-----------------
पेरणीपूर्वीचे नियोजन ः
यंदा रब्बी पेरणीची घाई न करता शेतातील परिस्थितीचा आढावा घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जमिनीतील ओलावा, पाण्याचा साठा, जमिनीचा प्रकार, पीक कालावधी आणि खर्च व बाजारपेठ या बाबींचा विचार होणे गरजेचे आहे.
- जमिनीतील ओलावा : पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा आहे का, हे तपासावा. केवळ वरचा थर ओला आहे म्हणून पेरणीची घाई करू नये.
- पाण्याचा साठा : विहीर, बोअरवेल, शेततळे किंवा कालव्यामधून प्रत्यक्ष किती पाणी उपलब्ध होईल, याचा अंदाज घेऊन पिकाचे नियोजन करावे.
- जमिनीचा प्रकार ः हलकी, मध्यम, खोल काळी किंवा भारी जमीन यानुसार पीक पद्धतीची निवड करावी.
- पिकाचा कालावधी : कमी कालावधीत तयार होणाऱ्या आणि कमी पाण्यात येणाऱ्या वाणाच्या निवडीस प्राधान्य द्यावे.
- खर्च आणि बाजारपेठ : बियाणे, खते, मजुरी, सिंचन खर्च आणि अपेक्षित बाजारभाव यांचा विचार करून पीक पद्धती ठरवावी.
सद्यःस्थितीत रब्बीचे नियोजन करताना एकूण उपलब्ध क्षेत्राचे तीन भाग करावेत. जसे की पावसावर अवलंबून असलेले क्षेत्र, मर्यादित सिंचनाचे क्षेत्र आणि खात्रीशीर सिंचनाचे क्षेत्र. त्यानुसार स्वतंत्र पीक नियोजन करावे. दुष्काळी परिस्थितीत कमी पाण्यात तग धरणारी, तुलनेने कमी खर्चाची आणि स्थानिक हवामानाला अनुकूल पिके निवडणे फायदेशीर ठरू शकते.
--------------------
चौकट ः
पीक अवस्थेनुसार नियोजन ः
पीक--संभाव्य परिस्थिती---महत्त्वाची काळजी
हरभरा---मध्यम ते खोल काळी जमीन आणि पुरेसा जमिनीतील ओलावा---फुलोरा व घाटे भरण्याच्या वेळी ओलावा महत्त्वाचा
रब्बी ज्वारी---कोरडवाहू व मध्यम ते खोल जमीन---धान्याबरोबर कडब्याचेही नियोजन
करडई---मर्यादित ओलावा असलेली योग्य जमीन---सुरुवातीची उगवण चांगली होणे आवश्यक
मसूर---योग्य थंड हवामान व स्थानिक जमिनीची अनुकूलता---कमी ओलाव्यातील योग्य वाण निवडावा
मोहरी---योग्य हवामान व बाजारपेठ उपलब्ध असलेल्या भागात---स्थानिक कृषी शिफारशींनुसार पेरणी
जवस---योग्य जमीन व हवामान असलेला भाग---पेरणीपूर्वी बाजारपेठ आणि वाण तपासावा
गहू---खात्रीशीर सिंचन उपलब्ध असलेले क्षेत्र---पाण्याची उपलब्धता तपासूनच क्षेत्र निश्चित करावे
हरभरा, रब्बी ज्वारी आणि करडई ही पिके राज्यातील अनेक भागांसाठी रब्बी हंगामाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. मात्र, कोणतेही पीक सर्व प्रकारच्या जमिनीत आणि प्रत्येक जिल्ह्यात एकसारखे यशस्वी होईल असे नाही. पेरणीपूर्वी संबंधित कृषी विद्यापीठाच्या जिल्हानिहाय शिफारशी तपासाव्यात.
पीक पद्धतीची निवड ः
अ) पूर्णपणे पावसावर अवलंबून असलेले क्षेत्र ः
- जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास हरभरा, रब्बी ज्वारी किंवा करडई यांचा विचार करावा.
- हलक्या जमिनीत ओलावा अपुरा असल्यास पेरणीची घाई करू नये.
- स्थानिक परिस्थितीनुसार कमी कालावधीची पिके आणि योग्य वाण निवडावेत.
- जमिनीत ओलावा नसल्यास, महागडे बियाणे, खते व इतर निविष्ठांवर मोठा खर्च करू नये.
ब) मर्यादित सिंचन ः
- उपलब्ध संपूर्ण क्षेत्रावर गहू लागवड करण्याऐवजी हरभरा, करडई किंवा रब्बी ज्वारीला प्राधान्य द्यावे.
- गहू किंवा इतर पाण्याची अधिक गरज असलेली पिके केवळ खात्रीशीर पाणी उपलब्ध असलेल्या मर्यादित क्षेत्रावर घ्यावीत.
- पीक वाढीच्या महत्त्वाच्या संवेदनशील अवस्थांसाठी सिंचनाचे काटेकोर नियोजन करावे.
क) खात्रीशीर सिंचन ः
- गहू, हरभरा आणि इतर योग्य रब्बी पिकांचे नियोजन करता येईल.
- ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा.
- पाण्याचा अनावश्यक वापर टाळून सिंचनाचे वेळापत्रक तयार करावे.
- जनावरांसाठी आणि घरगुती वापरासाठी आवश्यक पाणी राखून ठेवावे.
----------------------
आंतरपीक पद्धतीचा अवलंब ः
एकाच पिकावर संपूर्ण क्षेत्र अवलंबून ठेवणे संभाव्य दुष्काळी परिस्थितीत योग्य ठरणार नाही. त्यामुळे जमिनीचा प्रकार, ओलावा आणि स्थानिक शिफारशीनुसार आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. आंतरपीक पद्धतीमुळे एकाच पिकावर अवलंबित्व कमी होण्यास आणि उपलब्ध जमिनीचा अधिक चांगला वापर करण्यास मदत होते. शिवाय एका पिकापासून अपेक्षित उत्पादन न मिळाल्यास दुसऱ्या पिकापासून उत्पन्न हाती येते. त्यामुळे संभाव्य आर्थिक जोखीम कमी होण्यास मदत मिळते. स्थानिक परिस्थितीनुसार रब्बी ज्वारी अधिक हरभरा, करडई अधिक हरभरा अशा आंतरपीक पद्धतीचा विचार करावा.आंतरपीक पद्धतीसाठी पीक निवड करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
ओलावा टिकविण्यासाठी उपाय ः
दुष्काळी परिस्थितीत जमिनीतील प्रत्येक थेंब पाणी महत्त्वाचा असतो. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यासह जमिनीतील उपलब्ध ओलावा टिकविणे आवश्यक आहे. त्यासाठी
- पिकांचे अवशेषांचा आच्छादन म्हणून वापर करता येतो. पीक अवशेष जाळू नयेत. ज्वारीचे धसकट, सोयाबीनचे अवशेष, काडीकचरा इत्यादी पीक अवशेषांचा सेंद्रिय आच्छादनासाठी वापर करावा. हे सेंद्रिय पीक अवशेष पिकांच्या ओळींमधील उपलब्ध जागेत पसरवावे. त्यामुळे जमिनीचे तापमान आणि बाष्पीभवन कमी करण्यास मदत होते.
- बांधबंदिस्ती करावी. शेतातील पावसाचे पाणी बाहेर वाहून जाण्याऐवजी जमिनीत मुरेल याची काळजी घ्यावी.
- रुंद वाफा-सरी पद्धतीचा अवलंब करावा. त्यामुळे जमिनीचा प्रकार आणि पीक यानुसार योग्य पद्धतीने पाणी साठविणे आणि अतिरिक्त पाण्याचा निचरा करणे शक्य होते.
- वेळेवर आंतरमशागत करण्यास प्राधान्य द्यावे. त्यामुळे पिकांची तणांसोबत होणारी पाणी आणि अन्नद्रव्यांची स्पर्धा कमी होण्यास मदत मिळते.
- अनावश्यक खोल नांगरणी टाळावी. जमिनीतील ओलावा टिकविण्यास मदत करणारी योग्य मशागत पद्धती वापरावी.
-------------------
कमी पाण्यात सिंचनाचे नियोजन ः
सिंचनाचे पाणी मर्यादित असल्यास प्रत्येक पिकाला वारंवार पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे पीक वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये उपलब्ध पाणी देण्यास प्राधान्य द्यावे.
- सिंचनासाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाचा पद्धतीचा अवलंब करावा.
- शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी सिंचन करावे.
- पाटपाणी देणे टाळावे. पिकात पाणी साचू देऊ नये.
- जमिनीतील ओलावा तपासूनच नंतर सिंचन करावे.
- सिंचनाचे पाणी शेताच्या सर्व भागांत समान पोहोचते का, हे तपासावे.
पीक---संवेदनशील अवस्था
हरभरा---फुलोरा आणि घाटे भरणे
गहू---मुकुटमुळे फुटण्याची अवस्था आणि पुढील महत्त्वाच्या वाढीच्या अवस्था.
रब्बी ज्वारी---उगवण आणि कणसे येण्याची महत्त्वाची अवस्था
करडई---उगवण आणि सुरुवातीची वाढ
--------------------
पाण्याचा ताण पडल्यास करावयाचे उपाय ः
पाण्याचा ताण पडल्यास पिकांमध्ये काही लक्षणे दिसून येतात. जसे
- दुपारच्या वेळी पाने कोमेजणे.
- पानांचा हिरवेपणा कमी होणे.
- नवीन फुटवे आणि फांद्यांची वाढ मंदावणे.
- फुलगळ किंवा घाटे/दाणे कमी भरणे.
- झाडांची उंची आणि जैविक वाढ कमी होणे.
अशी लक्षणे दिसल्यास प्रथम जमिनीतील ओलावा तपासावा. पाणी उपलब्ध असल्यास पिकाच्या संवेदनशील अवस्थेत संरक्षित सिंचन द्यावे. तण नियंत्रण करावे. अनावश्यक फवारण्या, अतिरिक्त खतांचा वापर किंवा इतर खर्च टाळावा. पाण्याचा ताण असताना केवळ संजिवके किंवा इतर फवारणी केल्याने पाण्याची कमतरता भरून निघत नाही. त्यासाठी सिंचनाचे योग्य नियोजन, जमिनीतील ओलावा टिकविणे आणि पिकाच्या अवस्थेनुसार व्यवस्थापन करण्यास प्राधान्य द्यावे.
----------------------
महत्त्वाच्या टीप्स ः
- जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास पेरणीची घाई करू नये.
- उपलब्ध पाण्यापेक्षा जास्त सिंचनाची गरज असणारे पीक घेऊ नये.
- संपूर्ण क्षेत्रावर एकाच पिकाची लागवड करू नये.
- बियाणे खरेदी व इतर निविष्ठा खरेदी करताना पावती अवश्य घ्यावी. ती व्यवस्थित सांभाळून ठेवावी.
- पिकास पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.
- पीक वाढीच्या संवेदनशील अवस्थेनुसार सिंचन करावे.
- संपूर्ण हंगामात हवामान अंदाज, कृषी सल्ला, पीक विमा आणि चारा व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे.
- अनावश्यक रासायनिक खते, कीटकनाशके आणि इतर निविष्ठांचा अनावश्यक वापर टाळावा.
- वेळेवर तण नियंत्रणास प्राधान्य द्यावे.
- हवामानाचा अंदाज न घेता सिंचन किंवा रासायनिक फवारणी करू नये.
- पीकविमा, अनुदान आणि शासकीय मदतीच्या नोंदणीच्या अंतिम तारखा चुकवू नयेत.
- आपल्या जिल्ह्यात अधिसूचित पीक, विमा संरक्षण, नोंदणीची अंतिम तारीख आणि आवश्यक कागदपत्रे यांची तपासणी करावी.
- आर्थिक जोखीम कमी करण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना किंवा लागू असलेल्या इतर विमा योजनांची माहिती घ्यावी.
- कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठे आणि ग्रामपंचायत यांच्या संपर्कात राहावे.
- हवामान अंदाज आणि कृषी हवामान सल्ल्यांचा नियमित वापर करावा.
------------------------------------------
- डॉ. ज्ञानेश्वर राऊत, ९९२३४६४४८१
(कृषी वनस्पतिशास्त्र विभाग, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषी महाविद्यालय, कोल्हापूर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.