

पुणे/कोथरूड, ता. १५ : मद्यधुंद अवस्थेत भरधाव मोटार चालवून चार दुचाकींना धडक दिल्याची घटना गुरुवारी रात्री आठच्या सुमारास कोथरूडमधील एमआयटी महाविद्यालयासमोरील रस्त्यावर घडली. या अपघातात तीन ते चार दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी मोटारचालकाला पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.
कोथरूड पोलिसांनी २४ वर्षीय विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून, त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. एमआयटी महाविद्यालयाच्या दिशेने पौड रस्त्यावरून कोथरूड डेपोकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारीने तीन ते चार दुचाकींना धडक दिली. या प्रकारामुळे परिसरात गोंधळ उडाला. अपघातानंतर नागरिकांनी मोटार अडवून चालकाला बाहेर काढले. त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण घोडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण एमआयटी महाविद्यालयात शिकत असून, तो सिंहगड रस्ता परिसरात राहतो. तो मद्यप्राशन करून मोटार चालवत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, या प्रकरणी अद्याप कोणीही तक्रार दिलेली नाही.
दरम्यान, कोथरूडमध्ये आधीच वाहतूक कोंडी आणि पदपथांच्या अभावामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यात मद्यधुंद अवस्थेत भरधाव वाहने चालविण्याच्या प्रकारांमुळे पादचारी आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.