
दारुच्या नशेत कार चालकाने दोघांना उडवले
किरकटवाडी - दारूच्या नशेत असलेल्या कारचालकाने दोन दुचाकी स्वारांना धडक दिल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी सर्कल जवळ रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अपघातामध्ये दोन दुचाकी स्वार जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. योगेश पवार व विपील हळदकर अशी या अपघातातील जखमींची नावे आहेत.

हवेली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमेंद्र सिंग (रा.ललित, सी-405) हा कारचालक दारूच्या नशेत भरधाव वेगात कार चालवत होता. सोबत कारमध्ये त्याचा परिवार होता. नांदेड सिटी येथील सर्कल जवळ कार चालकाने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. यामध्ये योगेश पवार व विपील हळदकर हे जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर अपघातामध्ये दुचाकींचेही मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान कारचालक अमेंद्र सिंग याला हवेली पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी नेण्यात आले आहे. हवेली पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस हवालदार रामदास बाबर यांनी दिली आहे.
Web Title: Drunken Car Driver Hit Two Wheeler Crime Injured Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..