अबुधाबीतील कंपनीच्या प्रस्तावाला डीएसकेंचा हिरवा कंदील; सुचवले तीन पर्याय

सनील गाडेकर
Friday, 18 September 2020

'ड्रीम सिटी' पूर्ण करून त्याद्वारे ठेवीदारांना पैसे मिळावे म्हणून हा प्रकल्प विकसित करण्याची तयारी अबुधाबीतील 'एएफसीओ इन्व्हेस्टमेंट अँड मॅनेजमेंट' या कंपनीने दर्शवली आहे.

पुणे : 'डीएसके ड्रीम सिटी' प्रकल्प न्यायालयाच्या परवानगीने विकसित करण्याबाबत अबुधाबीतील बांधकाम व्यावसायिक कंपनीने दिलेला प्रस्ताव बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांनी स्वीकारला आहे. हा प्रकल्प नेमका कसा पूर्ण करता येईल, याबाबत त्यांनी तीन पर्याय सुचवले आहेत.

'ड्रीम सिटी' पूर्ण करून त्याद्वारे ठेवीदारांना पैसे मिळावे म्हणून हा प्रकल्प विकसित करण्याची तयारी अबुधाबीतील 'एएफसीओ इन्व्हेस्टमेंट अँड मॅनेजमेंट' या कंपनीने दर्शवली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव त्यांनी गेल्या महिन्यात सादर केला आहे. त्यावर प्रतिसाद देत डीएसके यांनी नेमके कशा पद्धतीने बांधकाम पूर्ण करता येईल, याचा आराखडा हा प्रस्ताव सादर करणारे वकील ऍड. चंद्रकांत बिडकर यांना पाठवला आहे.

पुणे जिल्हा परिषद बनली राजकारणाचा अड्डा; खेड पंचायत समितीवरुन सेना-राष्ट्रवादीत जुंपली​

विकसकाने पहिल्या दोन पैकी एक पर्याय स्वीकारावा, अशी इच्छा डीएसके यांनी व्यक्त केली आहे. पहिल्या दोन पर्यायांनुसार या प्रकल्पात 300 ते 400 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यास किमान चार ते नऊ हजार कोटी रुपयांचा नफा होऊ शकतो. गुंतवणुकीसाठी लागणारी रक्कम बुकींगमध्ये मिळू शकते, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

डीएसके यांनी सुचवलेले पर्याय :

डीएसके यांनी सुचवलेले पर्याय पर्याय विक्रीतून येणारे पैसे विकसकाचा वाट डीएसकेडीलचा वाटा बांधकाम खर्च
मूळ आराखड्याप्रमाणे बांधकाम (डीपीआर) 34,000 21,000 13,000 13,000
सर्व सामान्यांना परवडेल अशी घरे बांधावी 15,675 10,000 5,675 5,647
म्हाडाने प्रकल्प विकसित करावा 12,654 6,654 6,000 5,647

सरकारने 'ते' परिपत्रक तातडीने मागे घ्यावे; शिक्षक संघटनांनी केली मागणी​

लोकांनी किमान दगडं मारू नयेत :
या प्रकल्पात आता माझा आणि कुटुंबाचा वैयक्तिक फायदा नाही. प्रकल्प पूर्ण झाला, तर त्यातून ठेवीदारांचे सर्व पैसे परत मिळतील. आयुष्यभर सन्मानाने जगलो. आता सन्मानाने कर्जमुक्त होण्याची इच्छा आहे. मी गेल्यानंतर लोकांनी माझ्यावर फुले टाकू नये, पण किमान दगडे तरी मारू नयेत, एवढीच माफक अपेक्षा आहे, असे डीएसके यांनी ऍड. बिडकर यांना पाठवलेल्या प्रस्तावात नमूद आहे.

अबुधाबीतील कंपनीने दिलेला प्रस्ताव डीएसके यांनी मान्य केला आहे. बांधकाम नेमके कसे करता येईल, याबाबत त्यांनी काही सूचना केल्या आहेत. तसेच विकसनाबाबत तीन पर्याय सुचवले आहेत. त्यातील योग्य पर्यायाचा विचार करून प्रकल्प विकसित करावा. त्यानुसार प्रकल्प पूर्ण होऊन त्याची विक्री झाली, तर ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळू शकतात.
- ऍड. चंद्रकांत बिडकर

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DSK approves proposal of Abu Dhabi company