पुणे जिल्हा परिषद बनली राजकारणाचा अड्डा; खेड पंचायत समितीवरुन सेना-राष्ट्रवादीत जुंपली

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

यासंदर्भात पालकमंत्री अजित पवार यांना भेटलो. तेव्हा हे काम स्थानिक लोकप्रतिनिधीमुळे रखडल्याचे लक्षात आले आहे. मात्र यावर मार्ग काढण्याचे आश्वासन पालकमंत्री पवार यांनी दिले होते.

पुणे : पुणे जिल्हा परिषद राजकारणाचा अड्डा बनला आहे, अशी टीका शिवसेनेचे शिरूरचे माजी खासदार आणि सेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शुक्रवारी (ता.१८) केली. खेड पंचायत समितीच्या नवीन मुख्यालयाचे काम सुरू होत नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सेनेच्यावतीने जिल्हा परिषद मुख्यालयासमोर नंदीबैल आणि जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पाटील यांनी ही टीका केली. दरम्यान, यामुळे राज्य सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसलेल्या सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुणे जिल्ह्यात मात्र कलह निर्माण झाला आहे.

सरकारने 'ते' परिपत्रक तातडीने मागे घ्यावे; शिक्षक संघटनांनी केली मागणी

शिवसेनेचे तत्कालीन खासदार आणि आमदार या दोघांनी प्रयत्न करून खेड पंचायत समितीच्या नवीन मुख्यालयाची मंजुरी आणली आहे. त्यामुळेच खेडचे विद्यमान लोकप्रतिनिधी (नाव न घेता) या इमारतीचे बांधकाम सुरू होऊ देत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

आढळराव म्हणाले, "या इमारतीसाठी चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. बांधकाम सुरू करण्याच्या कामाचा (वर्क ऑर्डर) आदेश सहा महिन्यांपूर्वीच देण्यात आलेला आहे. कामाचे भूमिपूजनही झाले आहे. या प्रत्यक्षात काम सुरू होत नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे तिकडे आणि इकडे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शिवसेनेचे नेते असे दोन्हीकडे नुसते गोड गोड बोलत आहेत. दरम्यान, यासंदर्भात पालकमंत्री अजित पवार यांना भेटलो. तेव्हा हे काम स्थानिक लोकप्रतिनिधीमुळे रखडल्याचे लक्षात आले आहे. मात्र यावर मार्ग काढण्याचे आश्वासन पालकमंत्री पवार यांनी दिले होते. त्यात पुढे काही झालेच नाही. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाला जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे."

बर्थ डे स्पेशल...अमोल कोल्हे यांच्या गनिमीकाव्यापुढे विरोधक हतबल

सांग सांग भोलानाथ, खेड पंचायत समितीचे काम केव्हा सुरु होणार, असे नंदीबैलाला विचारत आणि आयुष प्रसाद जबाब दो, जबाब दो, अशा घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे यांनी निवेदन स्वीकारत, याबाबत आपली भूमिका वरिष्ठांना कळवू, असे आश्वासन दिले. शेंडगे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

आढळराव पाटील आणि सेनेचे जिल्हा परिषदेतील गटनेते देविदास दरेकर, जिल्हा प्रमुख माऊली कटके यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, शलाका कोंडे, तनुजा घनवट, शैलजा खंडागळे आदींसह खेड तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी सहभागी झाले होते.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित काम करत आहेत. जिल्हा पातळीवर खेड पंचायत समितीच्या इमारत बांधकामासारख्या छोट्या-छोट्या प्रश्नांवर राजकीय पक्षात वैचारिक मतभेद असू शकतात, पण त्याबाबत मित्रपक्षांवर बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा चर्चेतून मार्ग काढला पाहिजे. परंतु शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील हे लोकसभेला पराभूत झाल्यापासून बैचेन आहेत.

- प्रदीप गारटकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena former MP Shivajirao Adhalrao Patil criticized Pune Zilla Parishad