सांडपाण्यामुळे  मुळा नदी प्रदूषित 

- बाबा तारे  ------------------------- 
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019


पुणे : येथील राजीव गांधी पुलाच्या खालून गेलेल्या सांडपाणी वाहिनीचे चेंबर फुटून घाण पाणी थेट नदीपात्रात जात असल्याने मुळा नदीला प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. थेट नदीपात्रात मोठ्या प्रमाणात सांडपाण्याचा प्रवाह येत असल्याने दुर्गंधी पसरत आहे. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आल्याने पर्यावरणप्रेमी व स्थानिक नागरिकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

पुणे : येथील राजीव गांधी पुलाच्या खालून गेलेल्या सांडपाणी वाहिनीचे चेंबर फुटून घाण पाणी थेट नदीपात्रात जात असल्याने मुळा नदीला प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. थेट नदीपात्रात मोठ्या प्रमाणात सांडपाण्याचा प्रवाह येत असल्याने दुर्गंधी पसरत आहे. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आल्याने पर्यावरणप्रेमी व स्थानिक नागरिकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

महापालिका प्रशासनाने तातडीने आवश्‍यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी रहिवाशांची अपेक्षा आहे. 
महापालिकेच्या जलनिस्सारण (ड्रेनेज) विभागाच्या मुख्य खात्याच्या अखत्यारीत या चेंबरची दुरुस्ती येत असल्याने औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने संबंधितांना कळविण्यात आले आहे, परंतु याबाबत अजूनही यावर कुठलीच कारवाई न झाल्याने लाखो लिटर घाण पाणी नदीत सोडले जात आहे. यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होत असून पाण्याचा रंग काळा होत आहे. या पाण्याच्या प्रादुर्भावाने पुलाखालील भागात दुर्गंधी वाढत असून या चेंबरची दुरुस्ती लवकर करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. 
औंध परिसरातील अनेक सोसायट्या, घरांमधील सांडपाणी मोठ्या प्रमाणात या मुख्य सांडपाणी वाहिनीतून बोपोडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पुनर्प्रक्रियेसाठी पाठवले जाते, परंतु गेल्या एक महिन्यापासून ड्रेनेजच्या मुख्य खात्याच्या दुर्लक्षित कारभारामुळे सर्व पाणी नदीपात्रात मिसळत असल्याने नदीचे अस्तित्वच धोक्‍यात येत आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. याविषयी स्थानिक रहिवासी व औंध क्षेत्रीय कार्यालयाकडून पाठपुरावा करूनही चेंबरदुरुस्तीचे काम अद्यापही केलेले नाही. एकीकडे केंद्र सरकारकडून नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असताना महापालिकेच्या स्तरावर मात्र यास हरताळ फासला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. 
भविष्यात अशीच दुर्लक्षित परिस्थिती राहिली, तर नदीत जलपर्णींसह डासांची वाढ होऊन येथील आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. नदीपात्राशेजारील औंध गावठाण, सिद्धार्थनगर सोसायटीसह आजूबाजूच्या परिसरात दरवर्षी डासांचा प्रादुर्भाव होत असतो. यावर्षीही या घाण पाण्यात वाढणाऱ्या डासांमुळे येथील नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. तत्पूर्वी महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जनतेची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. 
त्याचबरोबर स्मशानभूमीजवळील चेंबरमधूनही थेट नदीत पाणी सोडले जात आहे. एकंदरीत औंध भागातील सांडपाणी वाहिनींच्या या समस्येबद्दल ड्रेनेजच्या मुख्य विभागाकडून लवकर कार्यवाही व्हावी, हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

""स्मशानभूमीजवळील चेंबरमधून नदीपात्रात सोडलेल्या सांडपाण्याचा त्रास आम्हाला नेहमीच सहन करावा लागतो. यामुळे पाण्यावर वाढणारी जलपर्णी व डासांची होणारी अमर्याद वाढ यामुळे आम्हाला येथे राहणे अवघड झाले आहे.'' 
- सचिन भालेराव, स्थानिक रहिवासी 

""महापालिकेचे अधिकारी, या क्षेत्रातील शास्त्रज्ञ व समाजातील घटकांनी एकत्र येऊन कृतिशील कार्यक्रम राबविण्यासाठी पुढे यायला हवे. प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी सर्व घटकांचे प्रबोधन व जागृती करणे गरजेचे आहे. यासह जनतेच्या कृतिशील सहभागातून प्रदूषणावर आळा आणता येईल, परंतु सर्वांनीच याकडे गांभीर्याने बघितले पाहिजे.'' 
- प्रमोद खांडेकर, निवृत्त प्राध्यापक, जैव तंत्रज्ञान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to dirty water Mula river became a polluted