अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे विंधनविहिरींत वाढ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

दीर्घकालीन धोक्‍याचा इशारा
सहा वर्षांपूर्वी विंधनविहिरीला सरासरी १०० फुटांपर्यंत पाणी लागत होते. मात्र आता १५० फुटांपर्यंत ड्रिलिंग करावे लागत असल्याचे एका विंधनविहीर व्यावसायिकाने सांगितले. जमिनीतील पाण्याची पातळी खोल जात असल्याने दीर्घकालीन धोक्‍याचा इशारा देण्यात येत आहे.

पिंपरी - दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्याने अनेक सोसायट्यांना पुरेसे पाणी मिळत नाही. परिणामी, विंधनविहिरी घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात सुमारे ३,९०० हून अधिक नोंदणीकृत गृहनिर्माण सोसायट्या आहेत. या सर्व सोसायट्या पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या सभासदही आहेत. सभासद नसलेल्या सोसायट्यांची संख्याही लक्षणीय आहे. उंच भागावर असणाऱ्या सोसायट्यांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने या सोसायट्यांकडून विंधनविहिरी घेण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. महापालिकेने समन्यायी पाणीवाटपासाठी प्रायोगिक तत्त्वावर दोन महिने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला होता. त्याची मुदत संपल्यानंतरही महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाणीपुरवठा दिवसाआडच सुरू ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आगामी उन्हाळ्याच्या दिवसांत विंधनविहिरींच्या मागणीत वाढ होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

यासंदर्भात पिंपरी-चिंचवड बोअरवेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश कदम यांनी सांगितले, की विंधनविहिरींच्या मागणीत सुमारे दहा टक्के वाढ झाली आहे. गतवर्षी पाऊस जास्त झाल्याने ज्या सोसायट्यांमध्ये १०० फुटांवर विंधनविहीर आहे, तेथे अद्याप चांगले पाणी आहे. नवीन बांधकामे सुरू असलेल्या बांधकाम व्यावसायिकांकडून असलेली मागणी मात्र जैसेथे आहे.

दोन वर्षांपूर्वी सहा इंची विंधनविहिरीसाठी प्रतिफूट ७०, तर साडेचार इंचीसाठीचे दर ८० रुपये असे होते. आता डिझेलचे दर ७२ रुपये प्रतिलिटरपर्यंत वाढल्यामुळे व्यवसाय करणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे सध्या सहा इंचीसाठी असलेले प्रतिफुटासाठीचे दर ६५ रुपयांवरून ७५ रुपये, तर साडेचार इंचीसाठीचे दर ८५ रुपये आकारण्यात येणार आहेत. याबाबत आठवड्याभरात संघटनेची बैठक बोलावून निर्णय घेण्यात येईल.
- गणेश कदम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to insufficient water supply increase in fissile wells