esakal | पुण्यात मंदिराचे गाभारे भाविकांनी गजबजले; पाडव्याच्या मुहूर्तावर जल्लोषात उघडली मंदिरे
sakal

बोलून बातमी शोधा

Due to the opening of the temples on the day of Diwali Padva the temple is crowded 2.jpg

शहरामध्ये दरवर्षी प्रथा पडली आहे की, पाडव्याच्या दिवशी सकाळी नागरिक घराबाहेर पडतात, विशेषतः सारस बागेमध्ये जातात. तेथे पहाटे पाडवा किंवा संगीतमय कार्यक्रमांची अनुभूती घेतात.

पुण्यात मंदिराचे गाभारे भाविकांनी गजबजले; पाडव्याच्या मुहूर्तावर जल्लोषात उघडली मंदिरे

sakal_logo
By
मंगेश कोळपकर

पुणे : शहरातील मंदिरे आणि सर्व प्रकारची धार्मिकस्थळे खुली झाल्यानंतर दिवाळी पाडव्यामुळे नागरिकांची तेथे गर्दी झाल्याचे सोमवारी सकाळी दिसून आले. त्यामुळे गेले सात महिने शांत असलेले गाभारे आज भाविकांनी गजबजून गेले मंदिरातही घंटानाद सुरू झाला.

हे ही वाचा : पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

शहरामध्ये दरवर्षी प्रथा पडली आहे की, पाडव्याच्या दिवशी सकाळी नागरिक घराबाहेर पडतात, विशेषतः सारस बागेमध्ये जातात. तेथे पहाटे पाडवा किंवा संगीतमय कार्यक्रमांची अनुभूती घेतात. परंतु यंदा नागरिकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने सारसबाग बंद ठेवली होती. त्यामुळे नागरिकांची पावले आपसूकच मंदिरांकडे वळाली. कसबा गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती, महालक्ष्मी देवीचे मंदिर आदी अनेक ठिकाणी सकाळी नागरिकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे अन्य धर्मियांची प्रार्थना स्थळे ही खुली झाली.

आज मंदिरामध्ये येणारे नागरिक नटून-थटून आलेले दिसत होते. विशेषतः महिलांची संख्या त्यात लक्षणीय होती. मंदिरे उघडण्याच्या प्रित्यर्थ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कसबा गणपतीसमोर महाआरती केली. त्यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार मुक्ता टिळक, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे ही वाचा :  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

सारसबागेजवळील महालक्ष्मी मंदिरात पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे यांच्या हस्ते आरती झाली. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. त्याप्रसंगी ही अनेक मान्यवर उपस्थित होते. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला सोमवारी सकाळी गर्दी झाल्यामुळे येथील वाहतुकीची काही वेळ कोंडी झालेली दिसत होती. नवी वाहनेही अनेकजण तेथे घेऊन येताना दिसत होते. 

मंदिरात जाणाऱ्या भाविकांमध्ये आजही ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी दिसत होती. मास्क असलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश देण्यात येत होता, तर तीर्थ असते. तेथे आज सॅनिटायझरच्या बाटल्या ही दिसत होत्या.

राज्य सरकारचे आभार : मुक्ता टिळक

'राज्य सरकार ने आजपासून मंदिरे व इतर धर्मीय प्रार्थना स्थळे सुरू करायला परवानगी दिली ती सुरू व्हावीत, या करता भारतीय जनता पार्टीने संपूर्ण राज्यात आंदोलन केले होते. त्याला आज यश आले आहे. मंदिरे खुली करणे म्हणजे नुसता लोकभावनेचा विषय नसून तो अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाहचा देखील प्रश्न होता. त्याची दखल राज्य सरकारने घेतली त्याबद्दल आभारी आहे' असे प्रतिपादन कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांनी केले. 

कसबा गणपती मंदिर येथे कसबा मतदारसंघाच्या वतीने आयोजित आनंदोत्सव प्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने,सभागृह नेते धीरज घाटे, कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांच्या सह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे आयोजन कसबा मतदारसंघाचे सरचिटणीस छगन बुलाखे, राजेंद्र काकडे, राणी कांबळे, अमित कंक, अश्विनी पांडे, संजय देशमुख, अरविंद कोठारी, उमेश चव्हाण, तेजेंद्र कोंढरे, पुष्कर तुळजापूरकर यांनी केले.