विषारी वायूने गुदमरतोय पुणेकरांचा श्‍वास 

योगीराज प्रभुणे
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

वाहनांमधून बाहेर पडणारा धूर हा नायट्रोजन डायऑक्‍साइडचा मुख्य स्रोत आहे. मेगासिटींपैकी पुण्याच्या तुलनेत मुंबईत सध्या नायट्रोजन डायऑक्‍साइडच्या उत्सर्जनाचे प्रमाण जास्त आहे; पण पुण्यातील वाहनांच्या वाढीचा वेग आणि वाहतूक कोंडी पाहता पुढील काही वर्षांमध्ये मुंबईइतकेच या वायूचे उत्सर्जन पुण्यात होण्याचा धोका आहे. 

- डॉ. संदीप साळवी, संचालक, चेस्ट रिसर्च फाउंडेशन 

पुणे : मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असलेल्या नायट्रोजन डायऑक्‍साइडच्या उत्सर्जनात देशातील मेट्रोसिटींमध्ये पुणे पहिल्या क्रमांकावर आहे. रस्त्यांवरून दिवस-रात्र धूर ओकत फिरणाऱ्या वाहनांमुळे शहरातील हवेत दर दिवशी सुमारे पाच हजार किलो नायट्रोजन डायऑक्‍साइड सोडला जात आहे. त्यामुळे पुणेकरांचा श्‍वास या विषारी वायूमध्ये गुदमरत आहे. 

नवी दिल्ली येथील "सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंट'तर्फे (सीएसई) देशातील 14 शहरांचा अभ्यास केला. त्यात मुंबई, दिल्ली, बंगळूर, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता या सहा मेगासिटींचा आणि पुणे, अहमदाबाद, जयपूर, कोची, विजयवाडा, लखनौ, चंडीगड आणि भोपाळ या आठ मेट्रोसिटींचा समावेश आहे. मेट्रोसिटींमध्ये पुण्यातील नायट्रोजन डायऑक्‍साइड उत्सर्जनाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे या अभ्यासातून पुढे आले आहे. 

कोलकातापेक्षा पुणे धोकादायक 

दीड कोटी लोकसंख्येच्या कोलकातामध्ये नायट्रोजन डायऑक्‍साइड उत्सर्जनाचे प्रमाण दर दिवशी चार हजार किलोपेक्षा कमी आहे. तेच प्रमाण पुण्यात सुमारे पाच हजार किलो आहे. नायट्रोजन डायऑक्‍साइडच्या उत्सर्जनात पुण्याच्या पुढे मुंबई, चेन्नई, हैदराबाद, बंगळूर आणि दिल्ली या मेगासिटी आहेत. 

खासगी वाहने कारणीभूत 

सक्षम सार्वजनिक वाहतूक असल्याने कोलकातामध्ये खासगी वाहनांमधून वर्षभरामध्ये प्रतिफेरी 200 ग्रॅम नायट्रोजन डायऑक्‍साइड उत्सर्जित होतो. पुण्यात हे प्रमाण तीनशेहून अधिक आहे. 

सर्वाधिक उत्सर्जन कधी? 

वाहन एकाच वेगाने चालविल्यास नायट्रोजन डायऑक्‍साइडचे उत्सर्जन कमी प्रमाणात होते; पण वाहतूक कोंडीमुळे समान वेगाने गाडी चालविली जात नाही. त्यात वेग कमी-जास्त होतो. गाडी रेस केली जाते. त्यातून मोठ्या प्रमाणात हा विषारी वायू वातावरणात सोडला जातो. पुण्यात आता नेमकी ही समस्या वाढत असल्याने नायट्रोजन डायऑक्‍साइडचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. 

आरोग्यास धोका 

- श्‍वसनाचे विकार 
- फुफ्फुसांना सूज येऊन कार्यक्षमता कमी होणे 
- डोळे चुरचुरणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to poisonous gas Breathing problems to Punekar