#PurandarAirport पुरंदर परिसरातील जमिनीतून सोन्याचा धूर 

air_port_
air_port_

विमानतळाच्या घोषणेनंतर भाव चौपट 

पुणे -  पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या परिसरातील जमिनीतून सध्या सोन्याचा धूर निघू लागला आहे. येथील विमानतळाची घोषणा झाल्यानंतर जमिनींचे भाव चारपटीने वाढल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला मिळालेल्या महसुलावरून समोर आले आहे. आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये पुरंदर तालुक्‍यातून मुद्रांक शुल्कापोटी सुमारे 25 कोटी 69 लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. याच तालुक्‍यातून आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये मुद्रांक शुल्कापोटी तब्बल 112 कोटी 73 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. 

पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू होता. त्यासाठी चार ते पाच पर्यायी जागा पुढे आल्या. त्यामध्ये पुरंदर येथील जागेचा प्रस्ताव होता. या जागांपैकी पुरंदर येथील जागा विमानतळासाठी निश्‍चित केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबर 2016 मध्ये केली होती. त्यानंतर विमानतळाच्या परिसरातील जमिनींच्या भावामध्ये भरमसाट वाढ होण्यास सुरवात झाली. 

गडकरींची सूचना वाऱ्यावर 
गेल्या महिन्यात पुणे भेटीवर आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या परिसरातील जमिनींच्या वाढत्या खरेदी-विक्री व्यवहारांची दखल घेतली होती. या परिसरातील जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर बंदी घालावी, अशी सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली होती. मात्र, तेथील व्यवहारांवर अद्याप बंदी घालण्यात आलेली नाही. त्यामुळे या परिसरातील जागांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार जोरात सुरू असल्याचे समोर आले आहे. 

महसूल जास्त अन्‌ दस्त कमी 
दस्तनोंदणी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्‍यातून मिळणाऱ्या महसुलात मोठी वाढ झाली असली तरी, दस्तांच्या संख्येत फार मोठी वाढ झालेली नाही. आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये तालुक्‍यात 7 हजार 816 दस्तांची नोंदणी झाली होती. मागील आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये ही संख्या 7 हजार 965 एवढी आहे. 

पुरंदर विमानतळाची घोषणा झाल्यानंतर आमच्या जमिनीचे दर चौपट झाले आहेत. सुरवातीला रेडीरेकनरचे दर कमी होते. आता रेडीरेकनरचे दर दुप्पट झाले असून, बाजारभाव चारपटीने वाढले आहेत. 
- एस. एस. मेमाणे, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com