Pune Band : पुणे बंद'मुळे विविध क्षेत्रातील व्यावसायिकांना सुमारे 33 कोटी रुपयांचा फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Due to Pune Bandh businessmen in various sectors have suffered around Rs 33 crores loss

Pune Band : पुणे बंद'मुळे विविध क्षेत्रातील व्यावसायिकांना सुमारे 33 कोटी रुपयांचा फटका

पुणे : विविध संघटनांनी मंगळवारी पुकारलेल्या "पुणे बंद'ला व्यावसायिकांनी प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. तर दुसरीकडे या बंदमुळे शहरातील व्यावसाय एक दिवस बंद ठेवावे लागल्याचा सर्वाधिक फटका व्यावसायिकांना बसला आहे. कपडे, सराफी बाजार, हॉटेल व्यवसाय, भुसार, भाजीपाला अशा वेगवेगळ्या व्यावसायांना मंगळवारी सुमारे 33 कोटी रुपयांचा फटका बसला. "पुणे बंद'मुळे व्यावसायिकांना सर्वाधिक आर्थिक झळ सोसावी लागल्याची सद्यस्थिती आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता.13) शहरातील सर्वधर्मीय शिवप्रेमींनी "पुणे बंद'ची हाक दिली होती. त्यास प्रमुख राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, शहरातील गणेशोत्सव मंडळे, धार्मिक संघटना, व्यावसायिक व व्यापारी संघटना अशा एकूण 24 संघटनांनी पाठींबा दर्शवित या बंदमध्ये सहभाग घेतला होता. या बंदला शहरातील व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला.

व्यावसायिकांना सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत तब्बल पाच ते सहा तास दुकाने बंद ठेवावी लागली. व्यावसायिकांच्या दृष्टीने मंगळवार महत्वाचा व व्यावसायाचा दिवस असल्याने या दिवशी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. मात्र मंगळवारी बहुतांश व्यापारी, व्यावसायिकांनी बंदमध्ये सहभाग घेतला, दुपारी तीन नंतर व्यवसाय कमी होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन अनेकांनी दिवसभर व्यवसाय बंद ठेवला. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शहरात कापड बाजरपेठ मोठी असून त्यांची दररोजची उलाढाल 8 ते 10 कोटी असते, त्यामध्ये कापड व्यावसायिकांचे 5 कोटी रुपयांचे नुकसान झाले. सराफी बाजारपेठेची दररोजची उलाढाल 25 कोटी रुपये असते, बंदमुळे त्यांचेही निम्मे म्हणजे 12 कोटी रुपयांचे नुकसान झाले. याच पद्धतीने हॉटेल व्यावसायिकांचे 2 कोटी रुपये, पीएमपीएलचे 2 कोटी रुपये, भुसार, फळ, भाजीपाला विभागाचे 12 कोटी रुपये अशा काही मोजक्‍या व्यावसायांचे 33 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

"बंद'मुळे व्यावसायिकांना कोट्यावधी रुपयांची आर्थिक झळ सहन करावी लागली. त्याबाबत विविध क्षेत्रामध्ये मंगळवारी दिवसभर चर्चा सुरु होती.दरम्यान, मंगळवारी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.मध्यवर्ती भागासह उपनगरामध्येही व्यावसायिकांनी आपली दुकाने पुर्णवेळ बंद ठेवून बंदमध्ये सहभाग दर्शविला. काही हॉटेल, किराणा अशा किरकोळ विक्रेत्यांनी आपली दुकाने दुपारी तीन वाजल्यानंतर सुरु केली. त्यामुळे नागरीकांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाल. बंदच्यावेळी शहरात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही.