बालेवाडी : पारंपरिक कला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर मेळ साधत बालेवाडीतील दोन भावांनी मिळून पर्यावरणपूरक गणपती मूर्ती निर्मितीचा कारखाना सुरू केला. त्यांच्या या व्यवसायामुळे गरीब घरातील मुलांनाही रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत..बालेवाडीतील स्थानिक रहिवासी ओंकार बालवडकर व त्यांचे आत्तेभाऊ शुभम कवडे यांनी स्वतःच्या भांडवलातून उभारलेल्या या कारखान्यात पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्ती तयार केल्या जातात. मूर्ती घडविणे, रंगकाम, सजावट, पॅकिंग आदी कामांसाठी येथे २० हून अधिक कारागीर व सहाय्यक कार्यरत आहेत..गेल्या सात वर्षांपासून हे दोघे भाऊ गणपती मूर्ती विक्रीसाठी स्टॉल लावत होते. यासाठी ते पेन या गावी जाऊन मूर्ती खरेदी करायचे. वारंवार येणे-जाणे असल्याने तिकडच्या कारागिरांशी त्यांची मैत्री झाली. ते कसे काम करतात हे समजून घेत या दोघांनी बालेवाडीत शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याचा छोटा कारखाना सुरू करण्याचे ठरविले. त्यानंतर एका मोठ्या पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी सुरुवातीला ६५ मूर्त्या बनवत आपल्या व्यवसायास सुरुवात केली..आता त्यांच्या कारखान्यास चार वर्षे पूर्ण झाली असून, या ठिकाणी ३५०० मूर्त्या बनविल्या जातात. सध्या बालेवाडीतील १५ स्टॉलवर आमच्या कारखान्यांतील मूर्तींची विक्री केली जाते. मूर्तीसाठी फेटा किंवा स्लिकच्या भरजरी कापडापासून बनविलेल्या विविध वस्त्रांनाही मागणी वाढत आहे. ही वस्त्रे बनविणारे कारागीरही कारखान्यावर येऊन हे काम करत असल्याने त्यांनाही चांगला रोजगार उपलब्ध झाल्याची माहिती ओंकार बालवडकर यांनी दिली.सकाळी पेपर टाकून घरोघरी दूध पोहचविणे आणि त्यानंतर शाळा व महाविद्यालय सांभाळत संध्याकाळी किंवा सुट्टीच्या दिवशी काही तरुण मुले या कारखान्यात काम करतात. त्यामुळे या मुलांच्या कुटुंबाला उत्पन्नाचा आधार मिळाला आहे. दरवर्षी दिवाळीपासून ते गणपती आगमनापर्यंत हे मूर्त्या बनविण्याचे काम सुरू असते..पूर्वी आम्ही पेणहून गणपती मूर्ती मागवत होतो; परंतु आपल्याच भागात हा कारखाना सुरू झाल्यामुळे आता तिकडे जावे लागत नाही. त्यामुळे येण्या-जाण्याचा वेळ वाचतो. गाडीभाडेही वाचते, तसेच प्रवासामुळे मूर्तींचे होणारे नुकसानही कमी झाले आहे.- सोहम मुरकुटे, व्यावसायिक, बाणेरमी या कारखान्याजवळील चाळीतच राहतो. सकाळी पेपर टाकून शाळेत जातो, घरी येऊन संध्याकाळी किंवा सुट्टीच्या दिवशी येथे गणपती मूर्ती बनविणे व रंगकाम करतो. सहा महिने आम्हाला येथे काम मिळत असल्याने आईला घर चालवायला थोडी आर्थिक मदत होते.- रोशन जाधव, विद्यार्थी.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.