पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

पुणे - आठव्या पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

पुणे - आठव्या पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

महाराष्ट्र साहित्य परिषद आणि स. प. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १३ व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे साहित्य संमेलन स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉल येथे ५ जानेवारीला सकाळी १० ते ५ यावेळेत होईल. यंदाचे संमेलन अनेकविध कार्यक्रमांनी रंगणार आहे.

यातील महाविद्यालयीन युवकांचा सहभाग लक्षणीय असून त्यांच्या पारितोषिक विजेत्या साहित्याचे सादरीकरण होणार आहे. महोत्सवाचा विषय ‘प्लॅस्टिकला नकार, वसुंधरेला होकार’ हा असून संमेलनातील विविध ठराव महाविद्यालयीन युवक मांडणार आहेत.  संमेलनाचे उद्‌घाटन सकाळी १० वाजता होणार असून ‘लोकसंस्कृती आणि लोकसाहित्यातील पर्यावरणाचा विचार’ या विषयावर संमेलनाध्यक्षांचे भाषण होईल. डॉ. श्रीकांत कार्लेकर यांचे प्लॅस्टिक प्रदूषणाचा भस्मासूर या विषयावर मार्गदर्शन, सांगलीचे बाबा परिट आणि कोल्हापूरचे आप्पासाहेब खोत यांचे ‘निसर्गकथा’ या संमेलनाचे मुख्य आकर्षण असणार आहे. कवी उद्धव कानडे आणि उरळी कांचन येथील कवयित्री कल्पना दुधाळ हे ‘शिवारातल्या कविता’ सादर करणार आहेत.

त्यानंतर पारितोषिक वितरण होणार असून नियोजित साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या समारोपाच्या भाषणाने संमेलनाचा समारोप होणार आहे. संमेलनासाठी प्रवेश विनामूल्य असून नावनोंदणी मसापच्या कार्यालयात किंवा masaparishad@gmail.com या मेल आयडीवर करावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eco-friendly Sahitya Sammelan Chairman Tara Bhavalkar