पहाडदरा भागात आर्थिक चणचणीमुळे आदिवासी महिलांची दिवाळी होणार का?

सुदाम बिडकर 
Monday, 19 October 2020

यावर्षी कोरोनो महामारीमुळे सार्वजनिक लग्न समारंभावर बंधने आल्याने सिताफळ रबडीला मागणी कमी झाली असल्याने प्रक्रीया उद्योग बंद आहेत.

पारगाव : यावर्षी पाऊस चांगला झाल्याने सिताफळांच्या उत्पादनात वाढ झाली खरी परंतु कोरोना महामारीमुळे सिताफळांची मागणी घटल्याने दरवर्षी सिताफळाच्या विक्रीतून मिळणार्या उत्पन्नावर दिवाळी साजरी करणार्या पहाडदरा (ता. आंबेगाव) येथील आदिवासी ठाकर समाजातील महिलांना यंदाच्या दिवाळीला आर्थिक चणचण भासणार आहे. 

पुणे-दौंड लोकल उद्यापासून सुरू होण्याची शक्यता

डोंगर रागांनी चारही बाजुने वेढलेल्या पहाडदरा या छोट्याशा गावात पावसाळ्यात ओढ्या नाल्यांमध्ये पाणी तर उन्हाळ्यातील काही महीने पिण्यासाठी टॅंकरच्या पाण्याचा आसरा अशी येथील परिस्थीती. या भागातून दररोज चार ते पाच चारचाकी वाहनांतून महीला बागायती गावांमध्ये रोजगारासाठी जातात.

परिसरातील डोंगरावर सिताफळांची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत सप्टेंबर, आॅक्टोबर व नोव्हेंबर महीन्यात सिताफळांचा बहार असतो. प्रत्येक कुटुंबातील महिला दिवसभर डोंगरदर्यात भटकंती करुन झाडांची सिताफळ तोडून गोळा करतात व ती आसपासच्या गावात किंवा शहरात विक्रीसाठी नेतात. यामधून महिलांना रोजगार मिळतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एक महिण्याच्या कालावधीत सिताफळ विक्रीतुन प्रत्येक महीला 10 ते 20 हजार रुपयांची कमाई करतात. त्या कमाईवर या कुटुंबाची दिवाळी साजरी होते. मागील वर्षी सिताफळाच्या 20 किलोच्या एका कॅरेटला 500 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत बाजार मिळाला होता. परंतु यावर्षी कोरोनो महामारीमुळे सार्वजनिक लग्न समारंभावर बंधने आल्याने सिताफळ रबडीला मागणी कमी झाली असल्याने प्रक्रीया उद्योग बंद आहेत. त्यातच कोरोनोमुळे नागरिक थंड पेयांपासून अद्यापही दुर राहत असल्याने ज्युसची दुकाने सुरु झाली नाही. या सर्व कारणाने सिताफळांच्या मागणीत मोठी घट झाली आहे. बाजारभावही मागच्या वर्षीच्या तुलनेने खुप घसरले आहेत. सध्या एका कॅरेटला 200 ते 300 रुपये बाजार मिळत असल्याचे जयदिप वीर व विलास पडवळ यांनी सांगीतले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावर्षी सिताफळातून मागच्या वर्षीच्या तुलनेने जेमतेम अर्धेच उत्पन्न मिळणार असल्याने दिवाळीच्या खर्चावर गंडातर आल्याचे सोनुबाई केदारी, संजना पडवळ, हौसाबाई पडवळ, सोनाबाई केदारी, चांगुणा केदारी, सपना केदारी, सोनाली भालेराव, गंगुबाई केदारी, सुशिला केदारी, लक्ष्मीबाई केदारी, किसनाबाई केदारी यांनी सांगीतले.

या भागातील डोंगरदर्यात असणार्या सिताफळांच्या झाडांना कोणतेही रासायनिक खते अथवा औषध फवारणी नसते. ही पुर्णपणे सेंद्रीय सिताफळे असल्याने गोड देखील असतात. या भागातील सिताफळांना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. भविष्यात या भागातील महीलांना एकत्रीत करुन सिताफळ प्रक्रीया उद्योग सुरु करुन महीलांना हक्काचा रोजगार उपलब्ध करण्याचा मानस पहाडदर्याच्या सरपंच राजश्री संतोष कुरकुटे यांनी व्यक्त केला. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The economic income from custard apple decreased in pahaddara