#बेरोजगारी शिक्षण पद्धतीत बदल हवा: प्रतापराव पवार

प्रतापराव पवार
सोमवार, 23 जुलै 2018

पुण्यात शुक्रवारी झालेल्या रोजगार मेळाव्याला तब्बल ५० हजार उच्च पदवीधारकांनी हजेरी लावली. त्यापैकी केवळ ३५५ जणांना ‘ऑफर लेटर’ मिळाले. बेरोजगारीचे हे वास्तव नक्कीच धक्कादायक आहे. या अनुषंगाने ‘सकाळ’ने सुशिक्षित बेरोजगारीचा महापूर लोटण्यामागील तज्ज्ञांकडून  जाणून घेतलेली कारणे.

आपल्या शिक्षण पद्धतीत पुस्तकी ज्ञानावर अधिकाधिक भर दिला आहे. पुस्तकात दिलेले उत्तर लिहिणे अनिवार्य असल्याने विद्यार्थ्यांना उत्तराला अनुसरून आपले मत मांडता येत नाही. पुस्तकी अभ्यासक्रमाचे पाठांतर केल्याने विद्यार्थ्यांना जास्त गुणदेखील मिळतात; परंतु त्यांना विषय किती समजला हे कळत नाही.

महाविद्यालये आणि विद्यापीठातील प्राध्यापकांमध्ये व्यासंगाची कमतरता जाणवते. प्राध्यापक अभ्यासू असतात; परंतु त्यांना प्रत्यक्ष अनुभव नसतो. वैद्यकीय अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना शिकताना प्रत्यक्ष अनुभव मिळतो, तसेच अनुभवी डॉक्‍टरांचे मार्गदर्शन मिळते; परंतु अभियांत्रिकी, वाणिज्य, विधी शाखेतील अभ्यासक्रमात अनुभवावर आधारित शिक्षणाचा अभाव आहे. 

 ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘एज्युकॉन’च्या माध्यमातून देशातील कुलगुरूंना, प्राध्यापकांना जगभरातील विद्यापीठांमध्ये नेण्यात येते. त्या-त्या देशातील शिक्षण पद्धतीची ओळख करून देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आशियामधील नावाजलेल्या सिंगापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी संस्थेत बीएमडब्ल्यू, रोल्स रॉईस संशोधन आणि विकास केंद्र आहे. यात प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काम कसे चालते, हे पाहता येते. त्यामुळे त्यांच्यातील प्रगल्भता वाढते.

उद्योग क्षेत्राची गरज आणि विद्यार्थ्यांना मिळणारे ज्ञान यात मोठी दरी आहे. त्यामुळे शिक्षणानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात उडी घेतल्यानंतर त्यांना काहीच येत नसल्याचे दिसून येते. या बाबत सरकारही गांभीर्याने विचार करत नाही. उद्योगांच्या गरजेनुसार शिक्षण पद्धतीत वेळीच बदल न केल्यास देशात बेरोजगारीचा स्फोट होईल. 

(श्री. पवार हे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी) च्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य आहेत.)
---------------------------
उद्योगांची गरज ओळखावी  - डॉ. अनिल सहस्रबुद्धे

काही विद्यापीठांमार्फत आजही जुन्या पद्धतीने शैक्षणिक अभ्यासक्रम राबविला जातो; परंतु विद्यापीठांनी अभ्यासक्रमात काळानुरूप बदल करावेत, असे सांगण्यात आले आहे.

उद्योग क्षेत्राची गरज लक्षात घेऊन विद्यापीठे, महाविद्यालयांनी नवे तंत्रज्ञान आणि अभ्यासक्रम राबविले पाहिजेत. तंत्र शिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या जवळपास ३० ते ४० टक्के विद्यार्थ्यांना सहजासहजी नोकरी लागणे शक्‍य आहे; परंतु त्यासाठी विद्यापीठांनी नवे बदल स्वीकारायला हवेत.

व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘इंटर्नशिप’च्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभवाची संधी मिळावी, यासाठी उद्योगांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन परिषदेमार्फत करण्यात आले आहे. त्याला प्रतिसाद मिळत आहे. 

विद्यापीठ आणि महाविद्यालय स्तरावर आसपासच्या उद्योगांशी मैत्रीपूर्ण संवाद व्हावा. त्यातून विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच प्रत्यक्ष अनुभव मिळण्यासाठी मैत्रीपूर्ण करार करण्यात यावेत, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

(डॉ. सहस्रबुद्धे हे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष आहेत.)

उद्याच्या अंकात - सनदी लेखापाल व गुंतवणूक सल्लागार भरत फाटक यांच्यासह अन्य तज्ज्ञांची बेरोजगारीविषयक मते.

रोजगार मेळाव्यासंबंधी सकाळमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त -
कुणी नोकरी देता का नोकरी?

Web Title: Educated unemployed issue Change education system says Prataprao Pawar