‘स्थायी’च्या परीक्षेत शिक्षण समिती ‘नापास’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

पाण्यासाठी तांब्याची बाटली
तांब्याच्या भांड्यातील पाणी आरोग्यासाठी लाभदायी असते. त्यामुळे महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील मुलांनाही तांब्याच्या भांड्यातील पाणी मिळावे, यासाठी तांब्याची बाटल्या खरेदी करण्याचा ठराव शिक्षण समितीने केला आहे. त्यासाठीच्या खर्चासाठी स्थायीकडे पाठविला आहे. मात्र, विद्यार्थी व बाटल्यांची संख्या, एकूण अपेक्षित खर्च कळविलेला नाही.

पिंपरी - विद्यार्थ्यांसाठी टॅब, डिजिटल क्‍लास रूम, स्काउट गाइड गणवेश, जॅकेट, सकस आहार आणि पाण्यासाठी तांब्याची बाटली देणे, असे सहा ठराव महापालिका शिक्षण समितीने केले आहेत. या सुविधा पुरविण्यासाठी येणाऱ्या खर्चाचे प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविले होते. मात्र, खर्चाची रक्कम मोघम दर्शविलेली असल्याने सर्व विषय फेरप्रस्तावासाठी स्थायी समितीने परत पाठविले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिका शिक्षण समितीने मंजूर केलेले ठराव, खर्चाच्या मंजुरीसाठी स्थायी समितीकडे येत असतात. महापालिका शाळांचा दर्जा सुधारावा, विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांची संख्या वाढावी, यासाठी शिक्षण समिती प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीनेच २३ डिसेंबरच्या सभेत समितीने विद्यार्थ्यांना टॅब, डिजिटल क्‍लास रूम, स्काउट गाइड गणवेश, जॅकेट, सकस आहार, पाण्यासाठी तांब्याची बाटली देण्याबाबतचे विषय मंजूर केले. मात्र, सविस्तर माहिती नसल्याने स्थायीने ते परत पाठविले. 

विद्यार्थ्यांसाठी टॅब
महापालिकेच्या १०८ पैकी १२ शाळा उपक्रमशील आहेत. त्यातील पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी टॅबखरेदीचा ठराव शिक्षण समितीने करून खर्चास मान्यता देण्याबाबत स्थायीला कळविले; परंतु एका टॅबची रक्कम किती, विद्यार्थी किती, टॅब कोणत्या कंपनीचे आहेत, कोणामार्फत खरेदी केले जाणार, याबाबतची माहिती दिलेली नाही. प्राथमिक शाळांमध्ये ई-लर्निंग अंतर्गत संगणक व प्रोजेक्‍टरच्या माध्यमातून डिजिटल क्‍लास रूम करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी अभ्यासक्रमानुसार सॉफ्टवेअर तयार करणे, एलईडी टीव्ही असणे, कॉम्प्युटर लॅब उभारणे, असे सुचविले आहे. मात्र, ही सर्व यंत्रणा उभारण्यासाठी किती खर्च येणार याबाबतची माहिती दिलेली नाही. 

स्काउट गाइड गणवेश
खासगी शाळांप्रमाणे महापालिका शाळांचा दर्जा सुधारावा, यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यातील एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना स्काउट गाइडचे प्रशिक्षण दिले जात आहे. मात्र, बहुतांश विद्यार्थी गरीब असल्याने स्काउट गाइडचा गणवेश घेऊ शकत नाहीत. त्यामुळे गणवेश खरेदीचा ठराव शिक्षण समितीने केला आहे. मात्र, खर्चाची रक्कम नमूद नाही. खासगी मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांप्रमाणे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी हाफ जॅकेट खरेदीचा सदस्य प्रस्ताव शिक्षण समितीने मंजूर केला आहे. त्यानुसार पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी जॅकेट खरेदी केली जाणार आहे. मात्र, एका जॅकेटची किंमत किती, विद्यार्थी संख्या किती याबाबतचा उल्लेख नाही. 

सकस आहार
विद्यार्थ्यांना शाळेची व शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी महापालिकेतर्फे आहार दिला जात आहे. मात्र, हा आहार पौष्टिक असावा, यासाठी अंडी व सफरचंद, डाळिंब, केळी यापैकी एक फळ प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यास शिक्षण समितीने मंजुरी दिलेली आहे. मात्र, यातही विद्यार्थी संख्या, अंडी किती द्यायची, त्यासाठी खर्च किती येणार, याचा उल्लेख केलेला नाही.

१०९ कोटींच्या कामांना मंजुरी
विविध विकासकामांसाठी सुमारे १०९ कोटी ५८ लाखांच्या खर्चास स्थायी समिती सभेने बुधवारी (ता. २२) बैठकीत मान्यता दिली. अध्यक्षस्थानी सभापती विलास मडिगेरी होते.

बोऱ्हाडेवाडी येथील आरक्षणावर शाळा इमारत बांधणे : ११ कोटी ७५ लाख; प्रभाग चारमध्ये शाळा इमारत बांधण्यासाठी ११ कोटी ७९ लाख; विवेकनगर, तुळजाई भागातील डीपी रस्त्याचे मजबुतीकरण : तीन कोटी ३५ लाख; निगडी सेक्‍टर २२ मधील विद्युत दाहिनीसाठी ३४ लाख; प्रभाग १५ मधील पालिका इमारतीची दुरुस्ती : २८ लाख; आकुर्डी रेल्वे स्टेशन ते पिंपरी- चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंतचा १८ मीटर रुंद रस्ता विकसित करणे : ७५ लाख; गवळीनगर व सॅंडविक कॉलनीत स्थापत्यविषयक कामे : ४७ लाख; चिंचवड लिंकरोड बाजूकडील व साई ग्रेस सोसायटीसमोरील व एम्पायर इस्टेट येथे उड्डाण पुलाखाली स्थापत्यविषयक कामे करणे : नऊ कोटी २३ लाख; मैलाशुद्धीकरण केंद्र व पंपिंग स्टेशनमधील विद्युतपुरवठा पूर्ववत करणे: ८१ लाख; थेरगाव उपविभाग वॉर्ड २३ मधील लघु व उच्चदाब वाहिन्यांचे खांब हलविण्यासाठी : २८ लाख; प्रभाग १४ मध्ये पदपथ व स्थापत्यविषयक काम: २६ लाख; रहाटणी, श्रीनगर, नखातेनगर, साईसागरनगरमध्ये रस्ते काँक्रिटीकरण : १३ कोटी ४४ लाख; प्रभाग दोनमधील शाळा इमारत बांधण्यासाठी १२ कोटी २८ लाख; तापकीरनगर, बळीराज कॉलनीत रस्त्यांचे काँक्रिटीकरण : ११ कोटी ६८ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली. 

जलनिस्सारणाची कामे
दत्तवाडी, विठ्ठलवाडी : ३२ लाख; नाशिक महामार्गाच्या पूर्वेस : ३६ लाख; सांगवीतील रामनगर : ४६ लाख; पवना नदीकडेने गुरुत्व वाहिनी देखभाल दुरुस्ती : ३८ लाख; कीर्तीनगर, विनायकनगर, समर्थनगरमध्ये सांडपाणी वाहिन्यांसाठी ४६ लाख; प्रभाग २३ व २४ मधील सांडपाणी वाहिनी स्थलांतरित करणे : ६७ लाखांच्या खर्चासही ‘स्थायी’ने मंजुरी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: education committee fail in standing committee