
पाठ्यपुस्तकांच्या वितरणाला गती मिळण्यासाठी कार्यवाहीचे 'दिनकर टेमकरांचे' आदेश
पुणे : राज्यातील शाळांमध्ये लाखो विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळावीत, यासाठी शिक्षण विभाग स्तरावरून वेगाने पावले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तालुका स्तरावरून शाळा स्तरावर पाठ्यपुस्तके वेळेत पोचवावीत आणि शाळेमार्फत विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण करावे, याबाबत कार्यवाहीचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या हाती शाळेच्या पहिल्या दिवशीच मोफत पाठ्यपुस्तके असतील, अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मागील आठवड्यात मुंबईतून सुरू झालेल्या पाठ्यपुस्तकांच्या वितरण प्रसंगाच्या निमित्ताने दिली होती. त्या अनुषंगाने पाठ्यपुस्तके वेळेत शाळापर्यंत पोचविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार, समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजनेत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी बालभारती भांडार ते तालुका, मनपा स्तरापर्यंत पाठ्यपुस्तकांची वाहतूक दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्यात यावी, असे टेमकर यांनी परिपत्रकात नमूद केले आहे. राज्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत यावर्षी तब्बल पाच कोटी ४० लाख ९० हजार ७०६ मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे.
तालुका स्तरावर पाठ्यपुस्तके मिळाल्यानंतर संबंधित शाळांना तत्काळ ती उपलब्ध करून द्यावीत. तालुका स्तरावरून शाळा स्तरापर्यंत जलद गतीने वाहतूक करण्याच्यादृष्टीने स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन वाहतूकदारांची नियुक्तीची कार्यवाही संबंधितांमार्फत करण्यात यावी. तसेच तालुका स्तरावरील मनुष्यबळाद्वारे पाठ्यपुस्तकांचे केंद्रातील शाळानिहाय, इयत्तानिहाय, विषयनिहाय तत्काळ वर्गवारी करून शाळापर्यंत पाठ्यपुस्तके पोचवावीत. पाठ्यपुस्तकांची शाळा, इयत्ता आणि विषयनिहाय विभागणी करताना छपाई व बांधणी करताना दोष आढळून आल्यास संपूर्ण तालुक्यातील अशा पाठ्यपुस्तकांची इयत्ता व विषयनिहाय संख्या बालभारतीला कळवावी. तसेच शाळांपर्यत पाठ्यपुस्तके सुस्थितीत पोचतील, याची दक्षता घ्यावी.’’ असे टेमकर यांनी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे सांगितले आहे.
‘‘तालुका स्तरावरून शाळांना पाठ्यपुस्तके वितरित करणे आणि शाळा स्तरावरून विद्यार्थ्यांना ती उपलब्ध करून देण्याच्या कामकाजाचे सुक्ष्म नियोजन करून त्याप्रमाणे पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी नियमितपणे क्षेत्रीय कार्यालयाचा आढावा घ्यावा. तसेच पाठ्यपुस्तक वितरणाची कार्यवाही करून समग्र शिक्षा योजनेस पात्र विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातील, याची दक्षता घ्यावी,’’ असे आदेश प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक दिनकर टेमकर यांनी परिपत्रकाद्वारे दिला आहे.
Web Title: Education News Order Of Director Of Education Dinkar Temkar To Expedite Distribution Of Textbooks Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..