सुप्यातील शैक्षणिक संकुल, आरोग्य सुविधेबाबत उपमुख्यमंत्री म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियोजित जागेची केली पाहणी
 

सुपे (पुणे) : सुपे (ता. बारामती) येथे लवकरच विद्या प्रतिष्ठानचे शैक्षणिक संकुल, भविष्यात १०० खाटांचे अद्ययावत रूग्णालय व बारामती बाजार समितीच्यावतीने भाजीपाला, कांदा, लिंबू, चिंच व भुसार मालाचे स्वतंत्र बाजारपेठ निर्माण होणार असल्याने सुप्याचे रूपडे पालटणार आहे. नियोजित जागांची पाहणी करून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधितांना सूचना केल्या आहेत.

- लॉकडाऊन शिथील होताच आत्महत्यांच्या घटना वाढल्या; काय आहेत याची कारणे?

रविवारी भल्या सकाळी पवार यांनी सुप्याला भेट देऊन ग्रामीण रूग्णालयाच्या ३० खाटांच्या क्षमतेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची व मोकळ्या जागेची पाहणी केली. ग्रामीण रूग्णालयाच्या नवीन इमारतीत भविष्यात १०० खाटांच्या क्षमतेची सोय होईल अशी अद्ययावत इमारत झाली पाहिजे. नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. अशा सूचना पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. भविष्यात या इमारतीचा विस्तार करून येथे आरोग्यविषयक अद्ययावत अधिक सुविधा कशा उपलब्ध करता येतील याची माहिती घेतली. रूग्णालयाच्या आवारात पवार यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. येथे लावण्यात येणारी झाडे कोणती असावीत याबाबतही त्यांनी सूचना केल्या.  

- 'अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय...'; सरकारच्या निर्णयाबाबत विद्यार्थ्यांचं म्हणणं काय?

सुप्यात विद्या प्रतिष्ठानचे शैक्षणिक संकुल लवकरच उभे राहत आहे. या जागेची पाहणी त्यांनी केली. येथे कला, वाणिज्य, शास्त्र शाखेचे वरिष्ठ महाविद्यालय, इंग्रजी माध्यमाचे विद्यालय, ग्रंथालय, वसतिगृह, मेस, कर्मचारी निवासस्थान आदी सुविधा होणार असल्याची माहिती निबंधक श्रीष कंबोज यांनी दिली. ग्रामीण भागात लवकरच आणखी शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुमारे २० एकर नियोजित जागेची पाहणी पवार यांनी केली. आगामी काळात भाजीपाला, कांदा, लिंबू, चिंच व भुसार मालाचे स्वतंत्र मार्केट उभे करता येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती अनिल खलाटे, सचिव अरविंद जगताप यांनी दिली. सध्याची मार्केटची जागा कमी पडत असल्याने गायरान जागेची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.  

- ...तरी चीनच्या अर्थव्यवस्थेवर काही फरक पडणार नाही; असं का म्हणाले चिदंबरम?

या दौऱ्यात त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सचिन सातव, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, हनुमंत पाटील, तहसिलदार विजय पाटील, कार्यकारी अभियंता मिलींद बारभाई आदी उपस्थित होते. सुप्यात सरकारी जागेत झालेल्या अतिक्रमणाची माहिती घेऊन, सदर खासगी अतिक्रमण काढून टाकून त्यांचे नियमानुसार पुनर्वसन करण्याच्या सूचना पवार यांनी प्रांताधिकाऱ्यांना केल्या.  याप्रसंगी सभापती नीता बारवकर, भरत खैरे, बाळासाहेब पोमणे, शौकत कोतवाल, शंकरराव चांदगुडे, सरपंच स्वाती हिरवे आदींसह परिसरातील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Educational complexes, health facilities and markets will change the supe