आता अजितदादा कोणाला म्हणणार, आमची भावकी कोठे आहे

दत्ता म्हसकर
Saturday, 8 August 2020

चौथीच्या मुलांसाठी चावडी वाचन हा उपक्रम त्यांनी तालुक्यात राबविला होता. हाच कार्यक्रम नंतर जिल्ह्यात राबविला गेला. पंचायत समितीचे सभापती पदाधिकारी व अधिकारी यांच्या समवेत गावभेट कार्यक्रमातून गावचे प्रश्न सोडविण्यास त्यांनी प्राधान्य दिले होते.

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व तालुका पंचायत समितीचे माजी सभापती दशरथ मारुती पवार (वय ६७) यांचे आज (ता. ८) सकाळी निधन झाले.

कोरोनाबाधित झाल्यावर दशरथ पवार यांच्यावर पुणे येथील एका खासगी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र, त्यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. त्यांना मधुमेह, रक्तदाब आदी आजारही होते. जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेल्यानंतर पवार हे जुन्नर तालुका पंचायत समितीचे सन 1992 ते 1997 या सलग पाच वर्षांत सभापती होते. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट पंचायत समितीचा पुरस्कार मिळाला होता. चौथीच्या मुलांसाठी चावडी वाचन हा उपक्रम त्यांनी तालुक्यात राबविला होता. हाच कार्यक्रम नंतर जिल्ह्यात राबविला गेला. पंचायत समितीचे सभापती पदाधिकारी व अधिकारी यांच्या समवेत गावभेट कार्यक्रमातून गावचे प्रश्न सोडविण्यास त्यांनी प्राधान्य दिले होते. तालुक्यात त्यांच्या काळात अनेक बंधारे झाले. त्याचा आज लोकांना लाभ होत आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पारुंडे हे दशरथ पवार यांचे मूळ गाव होते. येथे भरणाऱ्या नाथपंथीय साधूंच्या कुंभमेळा समितीचे ते अध्यक्ष होते. गावात एकोपा रहावा, यासाठी गावची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असे. गावच्या तंटामुक्त समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या पत्नी पारुंडे गावच्या विद्यमान सरपंच आहेत. जुन्नर येथील शिवाजी मराठा शिक्षण संस्था, क्रांती गणेश मंडळ यांच्याशी त्यांचा जवळून संबंध होता. सर्वसामान्य कार्यकर्ता ते सभापती व प्रगतशील शेतकरी म्हणून ते परिचित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार जुन्नरला आल्यानंतर त्यांची आमची भावकी कोठे आहे, असे म्हणत त्यांची आवर्जून चौकशी करत असत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पारुंडे व परिसरात शोककळा पसरली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eFormer Junnar Panchayat Samiti chairman Dashrath Pawar dies of corona