दापोडी-आकुर्डीदरम्यान आठ ब्लॅक स्पॉट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 October 2019

धोकादायक ठिकाणे

  • दापोडी भागातील लोहमार्गालगतचा परिसर 
  • कासारवाडी परिसर 
  • दळवीनगर 
  • पांढारकर वस्तीचा भाग 
  • गानगरचा भाग 
  • प्राधिकरणातील पीसीबी कॉलेज रोडनजीकचा लोहमार्ग
  • चिंचवडमधील आनंदनगर झोपडपट्टीचा भाग

पिंपरी - शहरातील दापोडी ते आकुर्डीदरम्यान रेल्वे प्रवासी नियम धाब्यावर बसवून लोहमार्ग ओलांडत आहेत. या मार्गावर आठ ठिकाणे धोकादायक असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे.

अनधिकृतपणे लोहमार्ग ओलांडताना सर्वाधिक अपघात हे पिंपरी ते देहूरोडदरम्यान झाले आहेत. पिंपरी परिसरात लोहमार्ग ओलांडणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच, आकुर्डी परिसरात लोहमार्गालगत महाविद्यालय आहे. त्या ठिकाणीही हे प्रकार सर्रास होतात. लोहमार्ग ओलांडणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत असले, तरी त्यात सातत्य नसल्याने प्रवाशांना त्याचा धाक उरत नसल्याचे दिसून आले आहे. वर्षातून चार ते पाच वेळा मोठी कारवाई करून अशा प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात दंडाची वसुली करण्यात येते. मात्र, त्यानंतर पुन्हा परिस्थिती तशीच राहते.

रेल्वेने पिंपरी, चिंचवड या रेल्वे स्थानकांवर लाखो रुपये खर्चून प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन फूटओव्हर ब्रिज तयार केले आहेत. मात्र, प्रवासी जीव धोक्‍यात घालून रेल्वेमार्ग ओलांडत आहेत.

वर्षभर कारवाई - झंवर
पुणे ते लोणावळा यादरम्यानच्या लोहमार्गावर पिंपरी, चिंचवड, तळेगाव, देहूरोड या परिसरात लोहमार्ग ओलांडताना अपघात झाले आहेत. रेल्वे सुरक्षा बलाकडून नियम तोडणाऱ्या प्रवाशांकडून सातत्याने कारवाई करण्यात येते. रेल्वेमार्गावरून होणारी ये-जा थांबविण्यासाठी प्रशासनाने अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग केले आहे. काही ठिकाणी सुरक्षा भिंतदेखील बांधल्या आहेत. रेल्वेमार्ग ओलांडणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचे काम वर्षभर सुरू असते, असे पुणे विभाग मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eight black spot during dapodi akurdi