पिकअप व ट्रॅक्टरचा अपघात; आठ जण गंभीर जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

Accident : पिकअप व ट्रॅक्टरचा अपघात; आठ जण गंभीर जखमी

न्हावरे - न्हावरे-तळेगाव ढमढेरे रस्त्यावरील दहिवडी घाट येथे पिकअप जीप आणि ट्रॅक्टर यांच्यात समोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात आठजण गंभीर जखमी झाले.

न्हावरे - तळेगाव ढमढेरे रस्त्यावर दहीवडी घाटात झालेल्या भीषण अपघातात राजश्री अण्णा चोपडे (वय ४०), श्रुती दुर्गडे (वय ३०), शोभा परमेश्वर महानवर (वय ५५), मिना वाघमोडे (वय ४५), सावित्री आशिष पाटील (वय ४०), रुपाली अण्णा केसकर (वय ३०), कविता युवराज बोराटे (वय ३५), अंजली महारनोर (वय ७) हे सर्वजण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर शिक्रापूर येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत. वरील सर्वजण करमाळा जि.सोलापूर येथील रहिवाशी आहेत.

या घटनेसंदर्भात घटनास्थळी जाऊन घेतलेल्या माहितीनुसार करमाळा येथील भाविक करंदी (ता. शिरूर) येथे मुक्कामी असलेल्या बाळुमामाच्या पालखी तळावर जेवणाची पंगत व धार्मिक विधी करण्यासाठी आले होते. धार्मिक विधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर परतीच्या मार्गावर असलेले हे भाविक पिकअप जीपगाडीत बसून करमाळ्याकडे निघाले होते.

न्हावरे तळेगाव ढमढेरे रस्त्यावरील दहीवडी घाटात तळेगाव ढमढेरेच्या दिशेने येणारे तसेच भाविक बसलेले पिकअप व न्हावरेच्या दिशेकडून येणारा ट्रँक्टर याच्यात समोरा समोर जोरदार धडक झाल्याने हा अपघात घडून आला. दरम्यान या अपघातात ट्रँक्टर चालकाने चुकीच्या दिशेने आपले वाहन आणल्याने हा अपघात झाला. या अपघातात पिकअप गाडी पलटी झाली असून ट्रँक्टरचे पाठीमागची चाके तुटून बाजुला पडली आहेत. तसेच ट्रँक्टरच्या इतर भागाचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघात घडल्यानंतर ट्रँक्टर चालक घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेचा पंचनामा न्हावरे पोलिस दूरक्षेत्र केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

टॅग्स :accidenttractor