ताटातूट झालेला बिबट बछडा आईच्या कुशीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard Calf

आंबेगाव तालुक्‍यातील अवसरी खुर्द-कौलीमळा येथे उसतोडणी सुरु असताना शुक्रवारी (ता. ३) बिबट्याचा बछडा मिळाला.

Leopard Calf : ताटातूट झालेला बिबट बछडा आईच्या कुशीत

मंचर - आंबेगाव तालुक्‍यातील अवसरी खुर्द-कौलीमळा येथे उसतोडणी सुरु असताना शुक्रवारी (ता. ३) बिबट्याचा बछडा मिळाला. मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचार्यांनी बछड्याला ताब्यात घेतले. ताटातूट झालेल्या बछड्याच्या शोधात बिबट मादी परिसरात फिरत होती. उसाच्या शेतात ठेवलेल्या बछड्याला बिबट मादीने अलगत उचलून मायेने घेऊन गेली.हे दृश्य पाहून वनकर्मचारी भारावून गेले.

शेतकरी बाबुराव विष्णू भोर यांच्या शेतात शुक्रवारी ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याचा बछडा दिसला होता.सुरक्षिततेच्या दृष्टीने वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस, वनपाल संभाजीराव गायकवाड व वनकर्मचार्यांनी बछड्याला ताब्यात घेतले. बछड्यापासून दुरावलेली बिबट मादी चौताळेल. अशी भीती व्यक्त केली जात होती.

बिबट मादीच्या ठिकाणाचा अंदाज घेऊन १५० फुट अंतरावर शुक्रवारी रात्री आठ वाजता प्लास्टिकच्या कँरेटमध्ये बछड्याला ठेवण्यात आले. कुत्री व अन्य प्राण्यांपासून बछड्याला धोका होऊ नये म्हणून वनकर्मचारी आर. आर. मोमीन, ऋषिकेश कोकणे, मनोज तळेकर तेथे दबा धरून बसले होते. तेथे सीसीटीव्ही कँमेरा तैनात केला होता. शनिवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजता बिबट मादीचे आगमन झाले. कँरेटमधून तिने बछड्याला बाहेर काढून सोबत नेले.

टॅग्स :LifeLeopardmanchar