

एकनाथ शिंदेंनी आपल्या मंत्र्यांना आवर घालावा
मनोज जरांगे पाटील यांचा सल्ला; फडणवीस, बावनकुळे, भुजबळ यांच्यावर टीका
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. ९ : राज्यातील मराठा समाज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहे. मात्र, त्यांनी आपल्या मंत्र्यांना आवर घालावा. मराठा समाज त्यांच्यापासून दुरावला तर त्यांचा पूर्ण पक्ष उघड्यावर पडेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केलेले जरांगे पाटील रविवारी (ता. ९) पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जरांगे पाटील म्हणाले, ‘‘सत्ता आणि बहुमताच्या जोरावर सरकारमधील नेत्यांच्या डोक्यात राजकारणाची मस्ती गेली आहे. मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा कट रचला जात आहे. या सरकारचा माज उतरवणे, हीच आमची पुढची दिशा असेल.’’ असा इशारा त्यांनी दिला.
एकनाथ शिंदे यांचे ओएसडी आणि मंत्री उदय सामंत यांच्याकडून चूक सुधारण्याचे फोन येत आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजूनही चूक सुधारण्यास तयार नाहीत, असा हल्लाबोलही त्यांनी केला. ‘‘बावनकुळे यांच्या माध्यमातून मराठा समाजावर अन्याय सुरू आहे. त्यांनी केलेली चूक फडणवीस यांनी मान्य करायला हवी. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, असे वाटणाऱ्या नेत्यांना आता जनतेची ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे,’’ असा इशाराही त्यांनी दिला.
कोल्हापूरमध्ये तब्बल ३ लाख नोंदी सापडल्या असून साडेसहा लाख मराठा समाज आरक्षणात जाऊ शकतो. ५८ लाख नोंदी देण्याचे कबूल केले असले तरी सातारा आणि औंध गॅझिटियरमधून मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही, असा कट सरकारने रचला आहे, असा आरोप त्यांनी केला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही त्यांनी टीका केली.
मंत्रिपदाचा गैरवापर करून मराठा समाजाचे वाटोळे करण्याचे काम सुरू आहे. मात्र, २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मोठ्या आंदोलनानंतर पुन्हा कोणीही मराठ्यांच्या नोंदी रद्द करण्याचे धाडस करणार नाही. आंदोलन शांततेच्या मार्गाने केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
साकडे घालणार नाही, कृतीतून दाखवून देणार
पंढरपूर दौऱ्यावर आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर विठुरायाला काय साकडे घातले, असे विचारले असता, ‘‘विठुरायाला साकडे घालणार नाही. कृतीतून दाखवून दिले जाईल,’’ असे त्यांनी सांगितले. सत्तेतील लोक मंत्रिपदाचा गैरवापर करत आहेत. मराठा समाजाचे वाटोळे करून ओबीसीचे भले करत आहेत. कोणाचेही वाटोळे करू नये. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामुळे भाजप अडचणीत आल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी घेतली भेट
मनोज जरांगे पाटील श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवासमध्ये मुक्कामी होते. रविवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजित पाटील आणि मोहोळचे आमदार राजू खरे यांनी त्यांची भेट घेतली. दोन्ही आमदारांनी जरांगे पाटील यांचे स्वागत करून सदिच्छा भेट घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.