

‘एल निनो’ परिस्थितीचे केळी पिकावर होणारे परिणाम
चंद्रशेखर गुळवे, डॉ. अरुण भोसले, सौ. अंजली मेंढे, डॉ. विजयराज गुजर
---------------------------------------------
हवामानातील बदलांमध्ये ‘एल निनो’ ही महत्त्वाची नैसर्गिक हवामान घटना आहे. एल निनोमुळे भारतातील पर्जन्यमान आणि तापमानात आमूलाग्र बदल होत आहेत. त्यामुळे केळी पिकाच्या लागवडीपासून ते वाढीपर्यंत विविध परिणाम दिसून येत आहेत.
------------------
महाराष्ट्रात तीन प्रमुख हंगामात केळीची लागवड केली जाते. मृग बाग म्हणजेच जून लागवड तर कांदे बाग म्हणजेच ऑक्टोबर लागवड तसेच खानदेशात केली जाणारी फेब्रुवारी लागवड. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातील प्रमुख केळी लागवडीखालील भागामध्ये उदा. जळगाव, सोलापूर, नंदुरबार, नांदेड, परभणी, पुणे, अहिल्यानगर आणि हिंगोली या भागाचा समावेश होतो. केळी हे उष्णकटिबंधीय हवामानातील महत्त्वाचे फळपीक असून, त्याच्या वाढीसाठी पोषक हवामान, पुरेसा पाऊस, हवेतील आर्द्रता आणि पाण्याची उपलब्धता यांचा मोठा प्रभाव असतो. हवामानातील बदलांमध्ये एल निनो (El Niño) ही महत्त्वाची नैसर्गिक हवामान घटना आहे. एल निनोमुळे भारतातील पर्जन्यमान आणि तापमानात आमूलाग्र बदल होत आहेत. त्यामुळे केळी पिकाच्या लागवडीपासून ते वाढीपर्यंत विविध परिणाम दिसून येत आहेत.
‘एल निनो’ म्हणजे काय?
प्रशांत महासागराच्या मध्य व पूर्व भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान नेहमीपेक्षा जास्त वाढण्याची घटना म्हणजे एल निनो. या घटनेमुळे जगभरातील हवामानाच्या पद्धतींमध्ये बदल होत आहे. भारतात सुद्धा या वर्षी एल निनोमुळे मॉन्सून बऱ्यापैकी कमजोर किंवा अनियमित राहिला आहे. पावसाच्या सरासरीमध्ये मोठी तूट अनेक प्रदेशामध्ये दिसून येत आहे. हवामानातील या बदलांचा केळी पिकावर विपरीत परिणाम होऊ शकतात.
केळी पिकावर एल निनो मुळे होणारे परिणाम
- पाण्याची कमतरता ः पाऊस कमी किंवा अनियमित झालेल्या जमिनीतील ओलावा कमी होतो. केळीला सातत्याने पाण्याची आवश्यकता असल्याने पाण्याचा ताण आल्यास वाढ खुंटणे, पानांचा आकार कमी होणे आणि घडाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो.
- तापमानात वाढ ः केळी पिकाच्या वाढीसाठी उष्ण दमट हवामान पोषक असते. २० ते ३३ अंश सेल्सिअस तापमान पिकाच्या वाढीसाठी व दर्जेदार उत्पादनासाठी उपयुक्त असते. पान उमलण्यासाठी ३० अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. घडाच्या वाढीसाठी २१ - २२ अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. अल निनोच्या काळात काही परिस्थितींमध्ये तापमान वाढू शकते. वातावरणाचे तापमान वाढल्यानंतर केळीच्या झाडांची प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. तीव्र सूर्यप्रकाशामुळे पानांची पश्चिमेकडील कडा करपली जाते. नवीन लागवड केलेल्या लहान रोपांची सुरळी पाने उमलत नाहीत, पांढरी राहते आणि करपली जाते. करपलेल्या ठिकाणी काळे डाग उमटले जाते. तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक गेल्यास बाष्पीभवनाद्वारे झाडांमधील पाण्याचे उत्सर्जन वेगाने होते. झाडांमधील विकरे (एन्झाइम्स) आणि संप्रेरके (हार्मोन्स) यांची कार्यक्षमता कमी होते. बऱ्याच वेळा ते नष्ट होतात. जमिनीचे तापमान वातावरणातील तापमानापेक्षा २-३ अंश सेल्सिअस अधिक जाते. तेव्हा या तापमानामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत जातो. या मुळे झाडांचा अन्नद्रव्य शोषून घेण्याच्या क्रियेवर विपरीत परिणाम होतो. मुळांची वाढ खुंटते. वातावरणातील आर्द्रता २० ते १० टक्क्यांपर्यंत खालवते. या सर्व बाबींचा परिणाम केळीचा एकूण वाढीवर होतो. वाढ खुटंते. घड निसवण्याच्या अवस्थेत असताना निसवण होत नाही, घड अडकतात, वेळप्रसंगी बाहेर पडत नाही. निसवलेल्या घडातील वरच्या बाजूच्या फण्या तीव्र सूर्यप्रकाशामुळे करपतात आणि वाळून जातात. घडांचा दांडा काळा पडून घड सटकण्याचे अधिक प्रमाणात वाढते. तसेच घडातील फण्या गळण्याचे प्रमाण अधिक होते. झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाण वाढते. अतितापमानामुळे पानांमधून पाण्याचे बाष्पीभवन वाढते आणि झाडावर उष्णता व पाण्याचा ताण निर्माण होतो.
- घडाच्या वाढीवर परिणाम ः पाण्याची कमतरता आणि जास्त तापमान यांचा एकत्रित परिणाम झाल्यास केळीच्या घडाचा आकार, फळांची संख्या व घडाचा आकार इ. गोष्टींवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
- फळांची गुणवत्ता ः अयोग्य पाणी व्यवस्थापनामुळे फळांचा आकार, वजन आणि एकसारखेपणा कमी होऊ शकतो. निर्यातक्षम केळीसाठी आवश्यक असलेली एकसमान फळांची वाढ व आकर्षक गुणवत्ता टिकवणे आव्हानात्मक ठरू शकते.
- कीड व रोग व्यवस्थापन ः हवामानातील तापमान व आर्द्रतेतील बदलांमुळे काही किडींच्या प्रादुर्भावाची तीव्रता बदलू शकते. त्यामुळे नियमित निरीक्षण आणि हवामानावर आधारित पीक व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते.
उपाययोजना
१) ठिबक सिंचनाचा वापर –
केळीसाठी ठिबक सिंचन अत्यंत उपयुक्त आहे. सिंचनासाठी ऑनलाइन किंवा इनलाइन ड्रीपरचा वापर करणे अधिक योग्य असते. केळी पिकात डबल ड्रीपचा वापर करावा. केळी पीक पाण्याच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असून, एकूण पिकाच्या कालावधीत केळीला १६०० ते २००० मि.मी. पाण्याची गरज असते. बाष्पीभवनाचा वेग, जमिनीची प्रतवारी, वाढीची अवस्था इ. बाबींवर केळीची पाण्याची गरज अवलंबून असते.
तक्ता - १ ः केळीसाठी पाण्याची गरज (लि. प्रति झाड प्रति दिवस)
अ.क्र. --- पाणी देण्याची वेळ --- केळीसाठी पाण्याची गरज (लि. प्रति झाड प्रति दिवस)
१ --- १ ते ४ महिने --- ४.५ ते ६.५
२ --- ५ ते ९ महिने --- ९ ते ११
३ --- १० वा महिना --- १४ ते १६
४ --- ११ वा महिना --- १८ ते २०
५ --- १२ वा महिना --- २१ ते २४
(* वरील पाण्याची मात्रा मार्गदर्शक असून, बाष्पीभवनाचा वेग, जमिनीचा प्रकार व पीकवाढीच्या अवस्था यानुसार योग्य ते बदल करावा.)
- मातीतील ओलावा निरीक्षण – मृदा ओलावा संवेदक वापरून गरजेनुसार सिंचनाचे नियोजन करावे. पाणी देताना पाणी देण्याचा कालावधी आणि वेळ हे देखील विचारात घेणे महत्त्वाचे आहे. बागेला पाणी देताना शक्यतो पहाटे द्यावे.
२) आच्छादनाचा वापर –
वातावरणातील तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो. जमिनीतील पाण्याचा अंश झपाट्याने खालवतो. अशा अवस्थेत केळी बागेमध्ये आच्छादनाचा वापर हा अपरीहार्य आहे. आमच्या संशोधन केंद्राने केलेल्या प्रयोगाअंती ३० मायक्रॉन जाडीचा चंदेरी /काळ्या रंगाचा पॉलिइथिलिन कापडाची केळीमध्ये शिफारस केलेली आहे. हा पॉलिइथिलिन कापड मृग बागेमध्ये केळीच्या दोन ओळीतील मोकळ्या जागेत नोव्हेंबर महिन्यापासून टाकण्यात यावे. अशा आच्छादनाच्या वापरामुळे जमिनीचा तापमान थंडीत टिकून राहते, तर उन्हाळ्यात वातावरणातील तापमानापेक्षा २-३ अंश सेल्सिअस कमी राहते. बाष्पीभवनाच्या वेग मंदावतो, जमिनीतील पाण्याचे अंश टिकून राहतो. जमिनीत उपयुक्त सूक्ष्म जिवाणूच्या संख्येत वाढ होते. घड सटकण्याचे, झाडे उन्मळून पडण्याचा प्रमाण खूप कमी होते. तणांचा बंदोबस्त होतो आणि एकूण उत्पादनात वाढ होते. ज्यांना पॉलिइथिलिन मल्च टाकणे शक्य नाही, त्यांनी केळीच्या दोन ओळींत उसाचे पाचट गव्हाचा किंवा सोयाबीनचा भुस्सा सेंद्रीय आच्छादन म्हणून वापरता येईल.
३) संतुलित खत व्यवस्थापन –
उपलब्ध ओलावा आणि पिकाच्या अवस्थेनुसार खतांचा वापर करावा.
- सेंद्रिय खते : शेण खत - १० किलो/ झाड किंवा गांडूळ खत- ५ किलो / झाड
- हिरवळीची खते : आंतरपीक म्हणून किंवा फेरपालट म्हणून चवळी, मूग, ताग, धैंचा इ. पिके घेऊन फुलावर येण्यापूर्वी जमिनीत गाडावीत.
- जैविक खते : केळी लागवडीच्या वेळी अॅझोस्पिरिलम २५ ग्रॅम/ झाड व पी.एस.बी. २५ ग्रॅम / झाड
- रासायनिक खते : केळीसाठी प्रति झाडास २०० ग्रॅम नत्र, ६० ग्रॅम स्फुरद व २०० ग्रॅम पालाश देण्याची शिफारस आहे. ही खते खोल बांगडी पद्धतीने किंवा कोली घेऊन द्यावीत. खतांची कार्यक्षमता वाढते.
तक्ता २- केळीसाठी जमिनीतून रासायनिक खत देण्याचे वेळापत्रक (ग्रॅम प्रति झाड)
अ.नं. --- खत मात्रा देण्याची वेळ
** --- युरिया --- सिंगल सुपर फाॅस्फेट --- म्युरेट आॅफ पोटॅश
१ --- लागवडीनंतर ३० दिवसांचे आत --- ८२ --- ३७५ --- ८३
२ --- लागवडीनंतर ७५ दिवसांनी --- ८२ --- ०० --- ००
३ --- लागवडीनंतर १२० दिवसांनी --- ८२ --- ०० --- ००
४ --- लागवडीनंतर १६५ दिवसांनी --- ८२ --- ०० --- ८३
५ --- लागवडीनंतर २१० दिवसांनी --- ३६ --- ०० --- ००
६ --- लागवडीनंतर २५५ दिवसांनी --- ३६ --- ०० --- ००
७ --- लागवडीनंतर ३०० दिवसांनी --- ३६ --- ०० --- ००
८ --- एकूण --- ४३५ --- ३७५ --- ३३२
(तक्तात दिलेल्या खत मात्रेत माती परीक्षण अहवालानुसार योग्य ते बदल करावेत.)
- फर्टिगेशन : केळीच्या अधिक उत्पादनासाठी व खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नत्र व पालाशयुक्त खतांच्या शिफारशीत मात्रेच्या ७५ टक्के मात्रा ठिबक सिंचनातून देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.
तक्ता ३- केळीसाठी ठिबक सिंचनातून खत देण्याचे वेळापत्रक (फर्टिगेशन)
अ.नं. --- आठवडे --- हजार झाडांसाठी खतांची मात्रा (किलो प्रति आठवडा)
** --- ** --- युरिया --- मोनो अमोनिअम फाॅस्फेट --- म्युरेट आॅफ पोटॅश
१ --- १ ते १६ (१६ आठवडे) --- ४.५ --- ६.५ --- ३
२ --- १७ ते २८ (१२ आठवडे) --- १३ --- ०० --- ८.५
३ --- २९ ते ४० (१२ आठवडे) --- ५.५ --- ०० --- ७
४ --- ४१ ते ४४ (४ आठवडे) --- ०० --- ०० --- ५
- सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर - केळी लागवडीनंतर दुसऱ्या व चौथ्या महिन्यात ईडीटीए जस्त आणि ईडीटीए लोह यांची प्रत्येकी ५० ग्रॅम १० लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. तसेच पाचव्या व सातव्या महिन्यात जमिनीमधून झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट प्रत्येकी १५ ग्रॅम प्रति झाड शेणखतात (१५० ग्रॅम) मुरवून वापरावे.
४) बाष्परोधकाचा वापर : केळीच्या पानातून होणाऱ्या बाष्पीभवनाच्या वेग नियंत्रित करण्यासाठी १५ दिवसांच्या अंतराने केओलीन या बाष्परोधक पावडरची ८० ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी. या फवारणीमुळे केळीच्या पानावर पांढरा थर तयार होतो. तो पानावरील छिद्रांना अंशतः बंद करतो.
५) घड व्यवस्थापन : केळीचा घड पूर्ण निसवल्यानंतर तसेच केळ कमळ तोडल्यानंतर पोटॅशिअम डाय हायड्रोजन फॉस्फेट ५० ग्रॅम अधिक युरिया १०० ग्रॅम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणे घडावर फवारणी करावी. या द्रावणामध्ये योग्य प्रमाणात चिकटद्रव्याचा वापर करावा. त्यामुळे घडातील केळीची जाडी, लांबी वाढून घडाच्या एकूण वजनामध्ये वाढ होते. किंवा केळफूल कापल्यानंतर एकदा व त्यानंतर ३० दिवसांनी दुसऱ्यांदा सल्फेट ऑफ पोटॅश २०० ग्रॅम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
या नंतर केळीच्या घडांचे तीव्र सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी केळीचे घडास ६ टक्के सच्छिद्र पांढऱ्या पॉलीथीन पिशव्यांचे आवरण करावे. पक्वतेच्या अवस्थेत असलेल्या घडांना आधार देणे आवश्यक असते. घडांना बाबूंचा किंवा पॉलीप्रोपॅलीन पट्ट्यांचा आधार द्यावा.
चंद्रशेखर गुळवे, ७५८८५४१२८६
०२५७-२२५०९८६
केळी संशोधन केंद्र, जळगाव
------------
PNE26W52013 संशोधन केंद्रामध्ये ३० मायक्रॉन जाडीचा चंदेरी /काळ्या रंगाचा पॉलिइथिलिन मल्चिंग पेपरवर केलेली केळी लागवड.
------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.