पुणे - ज्येष्ठ नागरिकांना रस्ते, पदपथांवरून चालता येत नाही, तर रस्ता ओलांडण्यासाठी १५-२० मिनिटे वाट पाहावी लागते. मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार असलेल्यांना लघुशंकेसाठी मुख्य रस्त्यांवर पुरेशी स्वच्छतागृहेही नाहीत. एखादा चोरटा कधी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढील याची शाश्वती नाही.
इतकेच नाही तर राज्य सरकारचा अध्यादेशच धुडकावून कुठल्याही मोफत आरोग्य तपासण्या, उपचार होत नाहीत. बंगळूरप्रमाणे पुणेदेखील ‘वृद्ध मैत्री शहर’ व्हावे याची स्वप्ने पाहणाऱ्या पुण्यातील दहा लाख ज्येष्ठ नागरिकांचा हा दैनंदिन अनुभव आहे.
‘वृद्ध मैत्री शहर’ करणे तर दूरच ज्येष्ठांचे साधे प्रश्नदेखील सुटत नसल्याचे शहरातील वास्तव आहे. ही परिस्थिती पाहता ‘मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते; कुठे तरी मी उभाच होतो... कुठे तरी दैव नेत होते!’...या सुरेश भट यांच्या ओळींची आठवण ज्येष्ठांना झाल्याशिवाय राहणार नाही.
शहरात एकूण लोकसंख्येच्या १० ते १२ टक्के इतकी ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. त्यामुळे बंगळूरप्रमाणे पुणेदेखील ‘वृद्ध मैत्री शहर’ म्हणून पुढे यावे, असे शहरातील ज्येष्ठ नागरिकांकडून स्वप्न पाहिले जात आहे. या संकल्पनेमुळे ज्येष्ठांसाठी आवश्यक सोयीसुविधा व सुरक्षितता देण्याचे काम होते.
या संदर्भात फेस्कॉम, ऍस्कॉप व जनसेवा फाउंडेशन या संघटनेच्या वतीने दहा वर्षांपूर्वी महापालिका आयुक्तांना ‘वृद्ध मैत्री शहर’ करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा संबंधित संघटनांनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे या संदर्भात भेट घेऊन ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची मागणी केली.
राज्य सरकारने अध्यादेश काढून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने ज्येष्ठांसाठी अद्ययावत ‘विरंगुळा केंद्र’ सुरू करण्याचे व ज्येष्ठांचे अन्य प्रश्न सोडविण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यामध्ये अद्यापही सुधारणा झाल्या नसून सरकारच्या योजना कागदावरच आहेत.
पेन्शनरांच्या शहरातच ज्येष्ठ नागरिक हतबल झाले आहेत. राज्य सरकारच्या आदेशानंतरही महापालिकेने कुठल्याही लाभाच्या योजना सुरू केलेल्या नाहीत. महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करूनदेखील ज्येष्ठांचे किरकोळ प्रश्नही सोडविले जात नाहीत. पुण्याला ‘वृद्ध मैत्री शहर’ करणे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ते शक्य होण्याची शक्यता नाही.
- अरुण रोडे, अध्यक्ष, फेस्कॉम, महाराष्ट्र राज्य
अशा आहेत ज्येष्ठांच्या मागण्या
भरधाव वाहने व वाहतूक कोंडीमुळे रस्ता ओलांडणे जिकिरीचे ठरते
ज्येष्ठांसाठी महत्त्वाच्या रस्त्यांवर स्वच्छतागृहांचा अभाव
अध्यादेशानंतरही ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, नाना/नानी पार्क नाहीच
रुग्णालयात अजूनही पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार नाहीच
सरकारी व खासगी कार्यालयांमध्ये ज्येष्ठांसाठी स्वतंत्र रांगांचा अभाव
शहरातील वृद्धाश्रम शासकीय योजनांपासून वंचितच
आकडे बोलतात
शहरातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या - ९ लाख
पुणे व पिंपरीतील ज्येष्ठ नागरिक संघटना - ३००
एकाकी/निराधार ज्येष्ठांची संख्या - ९ हजार
निराधार वृद्ध महिलांची संख्या - ४ हजार
अंथरुणाला खिळून असणारे - ३ हजार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.