
भरधाव टँकरच्या धडकेत अॅक्टिवावरील ज्येष्ठाचा मृत्यू
उंड्री : भरधाव पाण्याच्या टँकरची धडक बसल्याने अॅक्टिवावरील ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एन.आय.बी.एम.- उंड्री रस्त्यावर क्लोव्हर हायलँड बिल्डिंगसमोर आज (शुक्रवार, दि. २९ एप्रिल २०२२) दुपारी १२ च्या सुमारास झाला. राजेंद्र चंद्रकांत जाधव (वय ६८, रा. विद्यानिकेतन, उंड्री, ता. हवेली, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. त्यांचा मुलगा अमोल राजेंद्र जाधव यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, अॅक्टिवावरून ज्येष्ठ नागरिक एनआयबीएमकडे येत होते, त्यावेळी समोरून येणाऱ्या भरधाव टँकरची जोरदार धडक बसून अपघात झाला. या अपघातात अॅक्टिवावरील ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टँकरचालक पळून गेला. पोलिसांनी पाण्याचा टँकर जप्त केला आहे. कोंढवा पोलीस स्टेशनमधील सहायक पोलीस फौजदार डोईफोडे पुढील तपास करीत आहेत.