बारामती, राहुरीत विकासनिधी खर्चावर निर्बंध आचारसंहिता लागू; प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वितरण नाही
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १६ : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि महाराष्ट्र, गोवा, गुजरातसह आठ राज्यांमधील विधानसभांच्या पोटनिवडणुका जाहीर होताच केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. त्यानुसार खासदार, आमदार आणि विधानपरिषद सदस्यांच्या स्थानिक विकास निधीच्या खर्चावर निवडणूक आयोगाने निर्बंध लागू झाले. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नवीन निधी मंजूर किंवा वितरित करता येणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने काल जारी केलेल्या आदेशात आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच पुदुच्चेरी केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय जाहीर केला आहे. याशिवाय देशातील काही राज्यांतील विधानसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांमुळेही आचारसंहिता लागू करण्यात आली. यासोबतच, महाराष्ट्रातील राहुरी आणि बारामती, गोव्यातील फोंडा, गुजरातमधील उमरेठ, कर्नाटकमधील बागलकोट व दावणगेरे दक्षिण, नागालँडमधील कोरिडांग (अनुसूचित जमाती) तसेच त्रिपुरातील धर्मनगर विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. या ठिकाणी आचारसंहितेच्या काळात खासदार, आमदारांना स्थानिक विकास योजनांअंतर्गत कोणताही नवीन निधी जारी करता येणार नाही. आदेशापूर्वी कामाचा आदेश दिला असल्यास आणि प्रत्यक्ष काम सुरू झाले नसल्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ते सुरू करता येईल.आधीच सुरू असलेली कामे मात्र सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. पूर्ण झालेल्या कामांचे देयक देण्यावर कोणतीही बंदी नाही, मात्र संबंधित अधिकाऱ्यांची समाधानकारक पडताळणी आवश्यक असेल. तसेच ज्या योजनांसाठी निधी मंजूर झाला आहे, साहित्य खरेदी करून कामाच्या ठिकाणी पोहोचले आहे, अशा कामांना कार्यक्रमानुसार पुढे नेण्याची मुभा देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

