Chinchwad Bypoll Election : भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाची नोटीस Election Commission notice to BJP candidate Ashwini Jagtap in paid news case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashwini Jagtap

Chinchwad Bypoll Election : भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाची नोटीस

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुका जाहीर झाल्यापासून या निवडणुका जाहीर झाल्यापासून चर्चेचा विषय ठरल्या आहेत. आता प्रचाराचा धुराळा उडताना दिसत आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होणार आसून भाजपसाठी या दोन्ही निवडणुका चुरशीच्या असणार आहेत. त्यामुळे भाजपकडून निवडणुकीसाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे भाजपने रणनीती आखण्यात येत आहे.

अशातच भाजपच्या चिंचवडमधील उमेदवार अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने त्यांना पेड न्यूज प्रकरणामध्ये ही नोटीस धाडली आहे. जगताप यांच्याकडून आयोगाने लेखी उत्तर मागवले आहे. अश्विनी जगताप यांनी याबाबत खुलासाही पाठवला आहे. आता या उत्तराची पडताळणी आयोगाच्या विशेष समितीमार्फत सुरु आहे.

गेल्या काही दिवसांपासून कसबा आणि चिंचवडमध्ये प्रचाराचा धुराळा उडाला आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. याच प्रचारांच्या सर्व घडामोडींवर निवडणूक आयोग बारीक लक्ष ठेवून आहे. गेल्या काही दिवसांमध्ये चिंचवड मतदार संघात आचारसंहिता भंगाच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी 10 तक्रारीवरून गांभीर्याने कारवाई करण्यात आली आहे.

यामध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांनी पैसे देऊन बातमी प्रकाशित केली असल्याच्या प्रकरणात आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. चिंचवड विधानसभा पोट निवडणूकीच्या रणधुमाळीत आयोगातर्फे चालू घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी माध्यम प्रमाणीकरण आणि सह नियंत्रण समिती अर्थात एमसीएमसी नेमण्यात आली आहे. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगपात यांच्याबद्दलची एक बातमी न्यूज पोर्टल आणि एका साप्ताहिकात प्रकाशित करण्यात आली होती.

या बातमीमधील एकूणच मजकूर पेड न्यूज सारखा असल्याचे एमसीएमसी समितीच्या निदर्शनास आले होते. यावरून संबधित समितीने निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाला यासंबंधीचं पत्र पाठवलं होतं. त्यानुसार, पोट निवडणुकी संबंधित निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी १६ फेब्रुवारी रोजी भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना नोटीस पाठवली आहे.

अश्विनी जगताप यांचे लेखी म्हणणेही आयोगाने मागवले. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला अश्विनी जगताप यांनी खुलासादेखील पाठवला आहे. आता ही समिती सदर उत्तराची पडताळणी करणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे आयोगातर्फे काय कारवाई होणार, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली. तर कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर पोटनिवडणूक होत आहे. पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी येत्या 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 2 मार्च रोजी जाहीर करण्यात येईल.