मंगळवारपासून बीएलओ जाणार घरोघरी

मंगळवारपासून बीएलओ जाणार घरोघरी
Published on

बीएलओ मंगळवारपासून जाणार मतदारांच्या घरोघरी
एसआयआर मोहीम; प्रांताधिकाऱ्यांकडे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २५ : भारत निवडणूक आयोगाने हाती घेतलेल्या एसआयआर (स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्हिजन) मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा मंगळवारपासून (ता. ३०) सुरू होत आहे. जिल्ह्यातील ३ हजार ७२३ बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) मंगळवारपासून मतदारांच्या घरोघरी जाणार आहेत. ते मतदारांकडून गणनापत्रक भरून घेणार आहेत. बीएलओ मतदारांच्या घरी तीन वेळा जाणार आहेत. तिन्ही वेळा मतदार आढळला नाही, तर त्या मतदाराचा समावेश स्थलांतरितांच्या यादीत केला जाणार आहे.
एसआयआर मोहिमेतील प्रशिक्षणाचा अंतिम टप्पा सध्या त्या-त्या प्रांताधिकाऱ्यांकडे सुरू आहे. भारत निवडणूक आयोगाकडे २००२ मध्ये अस्तित्वात असलेल्या मतदार यादीची आताच्या मतदार यादीशी जुळवणी (मॅपिंग) केली जात आहे. मॅपिंगचे कामकाज सध्या जिल्ह्यात ८५.९४ टक्के पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील ३९ लाख ४१ हजार ९५ मतदारांपैकी ३३ लाख ८६ हजार ९०७ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. ग्रामीण भागातील आठ विधानसभा मतदारसंघांत हे काम ८९.८९ टक्के, तर सोलापूर शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांत हे काम ७५.५४ टक्के झाले आहे.
सोलापूर शहर उत्तरमधील २८.४० टक्के, सोलापूर दक्षिणमधील २४.२३ टक्के, तर सोलापूर शहर मध्यमधील २०.९७ टक्के मतदारांची नावे २००२ च्या मतदार यादीशी जुळलेली नाहीत. बीएलओ यांच्या मदतीला राजकीय पक्षांचे बूथ लेव्हल एजंट (बीएलए) काम पाहणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना भारत निवडणूक आयोगाने बीएलए नियुक्तीबाबत आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनाला भाजप, काँग्रेस, शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व इतर लहान पक्षांनीच प्रतिसाद दिला आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने ही एसआयआर मोहीम महत्त्वाची असल्याने या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चौकट...
आकडे बोलतात...
जिल्ह्यातील बीएलओ : ३७२३

पक्षांनी नेमलेले बीएलए
भाजप : १९९५
काँग्रेस : ६१०
शिवसेना : १६२२
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष : २१
इतर : २२
एकूण : ४२७०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com